टीम मंगळवेढा टाईम्स । आंतरजातीय प्रेमविवाहाच्या रागातून मंगळवेढा तालुक्यातील भाळवणी येथे एका सैनिकाच्या पित्याला गावात बांधून आणत झाडाला बांधून केलेल्या अमानुष मारहाण प्रकरणी पोलिसांनी व्हायरल झालेल्या क्लिप मधील १२ जणांवर आत्तापर्यंत गुन्हा दाखल केला आहे.
झाडाला दोरखंडाने लिंबाच्या फोकाने बेदम मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी मुलीकडील रघुनाथ महादेव कांबळे, उत्तम महादेव कांबळे, महादेव निवृत्ती कांबळे , नामदेव निवृत्ती कांबळे, मलकिऱ्या जालिंदर कांबळे, हणमंत कांबळे, परमेश्वर गोरख कांबळे, धनाजी जालिंदर कांबळे, आबा नामदेव कांबळे या ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
अजूनही या क्लिपमधील संशयितांचा शोध सुरूच आहे. या घटनेत काल सकाळी 8 वाजता दामाजी बरकडे यांना त्यांच्या वस्तीवर जाऊन बेदम मारहाण करत हाताला बांधून 3 किलोमीटर धिंड काढीत गावात आणण्यात आले. यानंतर त्यांना गावात एका झाडाला बांधून पुन्हा गावकऱ्यांदेखत मारहाण करण्यात आली होती. यावेळी सगळे गाव समोर असूनही कोणीच त्यांना सोडवण्याचा प्रयत्न केला नाही, मात्र याची माहिती पोलिसांना मिळताच तातडीने त्यांची सुटका केली.
यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केल्यावर वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली आणि 10 आरोपीना तातडीने अटक करण्यात आली. यात गावातील तंटामुक्त समितीच्या अध्यक्षांसह मुलीच्या कुटुंबातील वडील, भाऊ, चुलते, चुलत भाऊ यांनाही मारहाण प्रकरणी पोलिसांनी अटक केली. आता या प्रकरणातील एक महिला व एक अल्पवयीन मुलाला अटक करायची राहिली आहे. व्हायरल झालेल्या क्लिपमधून इतर आरोपीना शोधण्याची मोहीमही वेगाने सुरु झाली असून सोलापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी गावात भेट देऊन तपासाची पाहणी केली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाळवणी गावातील या तरुणाचे गावातील दुसऱ्या जातीच्या मुलीवर प्रेम होते. दोघांनीही 4 ऑगस्ट रोजी पळून जाऊन लग्न केले व मंगळवेढा पोलीस ठाण्यात हजर झाले होते. यानंतर दोन्हीकडील कुटुंबीय पोलिसांसमोर एकत्र येत हे प्रकरण संपवले होते. तरीही या नवविवाहित दाम्पत्याला गावातच एका पाहुण्यांकडे ठेवण्यात आले होते. यानंतर हे दाम्पत्य 7 ऑगस्ट रोजी पुण्याला नोकरीसाठी निघून गेले आणि वादाला तोंड फुटले. मुलाच्या वडिलांनी मुलीकडील मोठ्या जावयाला फोन करून मुलाकडे लक्ष देण्याची विनंती बापाच्या मायेने केली. मात्र तू आमच्या जावयाला फोन का केला असा सवाल करत मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या वडिलांना अमानुष मारहाण करत हाताला बांधून गावात आणत पुन्हा झाडाला बांधून मारहाण केली.
या प्रकरणामुळे बरकडे कुटुंब दहशतीखाली असून सैन्यदलात असणाऱ्या थोरल्या मुलाची पत्नी व तान्हे बाळ देखील घरात असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे. आपल्या कुटुंबियांच्या जीविताला धोका असल्याचे मुलाची आई सांगत असून आमचा मुलगा सीमेवर रक्षण करतोय आमचे रक्षण पोलिसांनी करावे अशी मागणी त्या करत आहेत.
Solapur mangalwedha bhalavani 12 booked for beating father to death over interracial love marriage
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज