टीम मंगळवेढा टाईम्स ।
सध्या मोहोळ तालुक्याच्या हद्दीतील सर्व अधिकृत वाळू ठेके बंद आहेत. वाळूचा बेकायदा उपसा करत असल्याच्या तक्रारी महसूल प्रशासनास प्राप्त झाल्या. मोहोळ तहसील प्रशासनाने मोठ्या प्रमाणात वाळू माफियांविरुध्द सातत्याने धडक कारवाया सुरु केलेल्या आहेत.
चोरीची वाळू जर तुम्ही घ्याल तर मोठ्या दंडाला सामोरे जाल, असा इशारा महसूल प्रशासनाने सर्वांना दिला आहे.
आतापर्यंत २७ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करीत ४८ लाख ७३ हजार २०० रुपये इतका दंड आकारण्यात आल्याची माहिती मोहोळचे तहसीलदार प्रशांत बेडसे- पाटील यांनी दिली.
बेडसे पुढे म्हणाले की, ज्या व्यक्तींनी दंड भरलेला नाही त्या व्यक्तींच्या स्थावर व जंगम मालमत्ता याचा अटकाव करुन सक्तीने वसुलीची कार्यवाही सुरु करण्यात त्यांनी दिली.
तसेच अवैध गौण खनिज रात्री-बेरात्री होणारे उत्खनन यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनाही गस्ती वाढविण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
तसेच पोलीस स्टेशन येथे अवैध गौण खनिजबाबत एफ. आय. आर. दाखल करुन त्याबाबत केलेल्या कार्यवाहीचा देखील आढावा वारंवार घेतला जात आहे. याबाबत पोलीस प्रशासन देखील सतर्क असून त्यांनी देखील गस्ती वाढविलेल्या असल्याची माहिती यावेळी दिली.
…तर बांधकाम मालकावरही गुन्हा
हद्दीमध्ये अवैध गौणखनिज वाहतूक व उत्खनन पथकाने वाळू उत्खनन व वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर व एक टेम्पोवर जप्तीची कार्यवाही केली. तालुक्यात सद्यस्थितीत वाळू लिलाव झालेला नाही, त्यामुळे अनधिकृत वाळू घेणे हा देखील गुन्हा आहे. नदीपात्रातून चोरून आणलेली वाळू बांधकामासाठी साठा करून वापरताना आढळल्यास सदर बांधकाम मालकावरही गुन्हा दाखल होऊ शकतो, याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. – प्रशांत बेडसे-पाटील. तहसीलदार, मोहोळ
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज