टीम मंगळवेढा टाईम्स ।
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जनतेशी संवाद साधत आता प्रत्येक गावाने कोरोनामुक्तीसाठी मोहिम सुरू करण्याचं आवाहन केलं. यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील घाटणे (ता.मोहोळ) गावचे तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांचाही उल्लेख केला.
हे तरुण आपलं गाव कोरोनामुक्त करु शकतात तर आपण का नाही? असा प्रश्न करत त्यांनी राज्यातील सर्व गावांना कोरोनामुक्तीची मोहिम हाती घेण्याचं आवाहन केलंय. तसेच मी स्वतः पोपटराव पवार, ऋतुराज देशमुख आणि कोमल करपे यांच्याशी बोलणार असल्याचंही नमूद केलं.
यानंतर आता या गावांविषयी अनेकांना उत्सुकता निर्माण झालीय. चला तर मग पाहुया काय आहे घाटणेचा कोरोनामुक्ती पॅटर्न घाटणेचे सरपंच ऋतुराज घाटणे हे सोलापूरमधील सर्वात तरुण सरपंच आहेत. घाटणे येथे मार्चपर्यंत एकही कोरोना रुग्ण आढळून आला नव्हता.
मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात गावात पहिला रुग्ण आढळला अन् तेथून दररोज कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढू लागला. अशा परिस्थितीमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करून गाव कोरोनामुक्त करण्यासाठी ग्रामस्थांना एकत्र करत “बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह” ही मोहीम जिल्ह्यातील सर्वांत तरुण सरपंच ऋतुराज देशमुख यांनी हाती घेतली.
याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि बघता बघता गावात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत गेली अन् आज गाव कोरोनामुक्त झाले आहे.
आगळीवेगळी “बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह” मोहीम
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील सर्वांत तरुण सरपंच म्हणून ऋतुराज देशमुख (वय 21) यांची घाटणेच्या (ता. मोहोळ) सरपंचपदी निवड झाली आहे. सरपंचपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर ऋतुराज यांनी गावाच्या विकासासाठी अनेक मोहिमा हाती घेतल्या असून, यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून निधी जमा करण्याचे काम त्यांनी हाती घेतले.
मात्र, यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने काही प्रमाणात अडथळा आणला आहे. मार्चपर्यंत घाटणेमध्ये एकही कोरोनाबाधित नव्हता. मात्र, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून गावात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली. कोरोनाची ही लाट थोपवून गावाला कोरोनामुक्त करण्यासाठी ऋतुराज यांनी सर्व ग्रामस्थांना एकत्र केले आणि सुरू झाली एक आगळीवेगळी “बी पॉझिटिव्ह, आपला गाव ठेवू कोरोना निगेटिव्ह” ही मोहीम.
या मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे आज घाटणे गाव कोरोनामुक्त झाले असल्याचे सरपंच ऋतुराज देशमुख यांनी सांगितले.
कोरोनामुक्तीसाठी गावात पंचसूत्री राबवली
“घाटणे ग्रामपंचायतीचा एक सेवक म्हणून तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुमच्या निरोगी आयुष्यासाठी ही तळमळ आहे. आपले पूर्ण सहकार्य देऊन गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी योगदान द्यावे,” असे आवाहन देशमुख यांनी ग्रामस्थांना केले.
या आवाहनाला ग्रामस्थांनी दिलेला प्रतिसाद आणि कोरोनामुक्त गाव करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीच्या आधारावर आपण गाव कोरोनामुक्त करू शकतो, असेही देशमुख म्हणाले.
मोहिमेनुसार गावात करण्यात आलेल्या उपाययोजना
गावातील जी मंडळी शहरात जातात किंवा लोकांच्या संपर्कातील विविध व्यवसायात असतात, त्यांच्या आवश्यकतेनुसार रॅपिड अँटिजेन टेस्ट केल्या गावातील 45 वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण मोहिमेत सहभागी करून घेतले गावात घरोघरी जाऊन आशा ताईंच्या माध्यमातून प्रत्येक आठवड्याला गावकऱ्यांची तपासणी केली जात असून त्यात त्याची ऑक्सिजन लेव्हल, तापमान चेक केले जाते
प्रत्येक कुटुंबाला एक “कोरोना सेफ्टी किट” दिले असून त्यात व्हिटॅमिन गोळ्या, सॅनिटायझर, मास्क, साबण उपलब्ध बाहेर गावातून राहण्यासाठी येणाऱ्या व्यक्तींना सक्तीने तीन दिवस क्वारंटाइन करून या माध्यमातून कोरोनाची चेन ब्रेक करण्याचा केला प्रयत्न सगळ्या मोहिमेत गरजेनुसार गावासाठी स्वतंत्र विलगीकरण कक्ष किंवा मिनी कोव्हिड सेंटर जिल्हाधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांच्या माध्यमातून सुरू करण्याचा
यापुढे विचार करोनामुक्त गाव करण्यासाठी रुग्णांचा शोध, तपासणी, उपचार, लसीकरण, नियमांचे काटेकोरपणे पालन या पंचसूत्रीच्या आधारावर गाव कोरोनामुक्त केले. गावात कोरोनाने दोन मृत्यू झाल्यानंतर लोकं वाड्या-वस्त्यांवर राहण्यासाठी जाऊ लागली.
इतके भीतीचे वातावरण कोरोनामुळे गावकऱ्यांमध्ये निर्माण झाले होते. मात्र, ग्रामपंचायतीने प्रभावी उपाययोजना केल्यानंतर पुन्हा एकदा वाड्या-वस्त्यांवर राहण्यासाठी गेलेले ग्रामस्थ गावात राहण्यासाठी येत आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील कोमल करपे या युवा सरपंचांचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. कोण आहेत कोमल करपे?
कोमल करपे या दक्षिण सोलापूर तालुक्यातील अंत्रोळी गावच्या सरपंच असून वयाच्या 21 व्या वर्षी त्यांनी सरपंचपद भूषविले. पहिल्यांदाच निवडणुकीत उतरुन अवघ्या 21 व्या वर्षी त्यांनी विजय मिळवला. बी.एस.सी. बॅटनी या विषयातून त्यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केलं आहे.
कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांना राजकारणात संधी मिळाली आहे. कोरोना काळात गाव कोरोनामुक्त केल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचं कौतुक केलं. अंत्रोळी गावची लोकसंख्या 2 हजार 298 इतकी आहे
2 हजार 298 पैकी 300 लोकांचे लसीकरण पूर्ण झालं असून गावात एकही कोरोना रुग्ण सापडला नाही. ट्रेसिंग, टेस्टींग आणि ट्रीटमेंट या त्रिसुत्रीद्वारे गाव केले कोरोनामुक्त.
गावातील लोकांना विश्वासात घेऊन प्रसंगी त्यांना कायद्याचा धाक दाखवून गाव कोरोनामुक्त केलं आहे. गावकऱ्यांच्या मदतीने आणि त्यांना विश्वासात घेऊन गाव कोरोनामुक्त करण्यात आलं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज