टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील हुलजंती येथे अनैतिक संबंधास अडथळा ठरणार्या पती सिद्धाप्पा धोंडाप्पा कोठे याचा पत्नी कमाळाबाई कोठे यांनी प्रियकर व त्याच्या मित्राच्या मदतीने खून केला होता.
याप्रकरणी कमळाबाई कोठे, प्रियकर दीपक मेटकरी व त्याचा मित्र रामचंद्र पेटरगे या तिघांना आजन्म कारवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. पंढरपूर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश चकोर श्रीकृष्ण बावीस्कर यांनी हा निकाल दिला.
याबाबत अधिक माहिती अशी, सिद्धाप्पा धोंडाप्पा कोठे याचा 26 एप्रिल 2014 रोजी रात्री डोक्यात, कानावर व डोळ्यावर वार करीत खून करण्यात आला होता.ही घटना हुलजंती (ता. मंगळवेढा) येथे घडली होती. याप्रकरणी मंगळवेढा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी तत्कालीन सहाय्यक पोलिस निरीक्षक एस. एस. चव्हाण व एस. एस. कोळे यांनी तपास केला. पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात 28/2014 नुसार सुनावणी झाली. 11 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.
साक्षीदारांच्या साक्षी व पुरावे याचे अवलोकन करून न्या. चकोर श्रीकृष्ण बावीस्कर यांनी तीनही आरोपींना आजन्म कारावास व प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
बेसावध असतानाच डोक्यात, डोळ्यावर केला वार
सिद्धाप्पाची पत्नी कमळाबाई कोठे हिचे दीपक मेटकरी याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्या दोघांच्या संबंधास सिद्धाप्पाचा अडसर होता. यातून वादही झाला होता.
यामुळे कमळाबाई व दीपक मेटकरी यांनी सिद्धाप्पाचा काटा काढायचा प्लॅन केला. त्यासाठी दीपकचा मित्र रामचंद्र पेटरगे यालाही सोबत घेतले. तिघांनी सिद्धाप्पा बेसावध असताना डोक्यात, कानावर व डोळ्यावर वार करून त्याचा खून केला होता.
न्यायालयात घटनेच्या आदल्या दिवशी सर्व आरोपींना एकत्र पाहणारी मयताची मुलगी लक्ष्मीबाई अनिल मासाळ, फिर्यादी रायाप्पा कोठे, मयताचा मुलगा भपण्णा कोठे, मयताची आई सायव्वा कोठे घटनेच्या वेळी मयतासह आरोपींना एकत्र पाहिलेला मलाप्पा तिपण्णा येडडे, शवविच्छेदन करणारे श्रीनिवास कोरुलकर, तपासी अधिकारी चव्हाण व काळे यांच्यासह एकूण ११ साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या.
मयत सिद्धाप्पा यांचा मृत्यू अपघाती नसून तो सदोष मनुष्यवध असून पुरावा एकमेकांशी सुसंगत आहे, असा युक्तिवाद सरकारतर्फे ॲड. सारंग वांगीकर यांनी केला.
दोषारोपपत्रात आलेला पुरावा, साक्षीदारांच्या जबाबाचे अवलोकन करून न्यायाधीश बावीस्कर यांनी दीपक आण्णासाहेब मेटकरी, रामचंद्र म्हाळप्पा पेटरगे व कमळाबाई कोठे या तिन्ही आरोपींना आजन्म कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मूळ फिर्यादीच्या वतीने ॲड. टी.यू. सरदार व ॲड. दत्तात्रय यादव यांनी काम पाहिले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज