स्वस्तात सोन्याचे आमिष दाखवून विजयपूर येथील तरुणांना बोलावून घेऊन धारदार शस्त्राने मारहाण करून त्यांच्याजवळील रोकड मोटारसायकल असा ७५ हजारांचा मुद्देमाल लुटून नेल्याची घटना घडली आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील तेरामैल ते औराद जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार घडला.
याबाबत सोहेल सलीम अहमद मुल्ला ( वय २३, रा. बबलेश्वर नाका , विजयपूर ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून राहुल भोसले, पिंट्या पवार, अशोक, पप्या व अनोळखी दोघे अशा सहाजणांविरुद्ध दरोड्याचा गुन्हा मंद्रूप पोलिसात दाखल झाला आहे.
फिर्यादी व त्यांचे मित्र नागराज पुजारी, अभिषेक क्षीरसागर, विश्वनाथ गडाळे ( तिघे विजयपूर ) असे चौघेजण दोन मोटारसायकलवरून विजयपूर येथून सोलापूरकडे येत होते.
त्यावेळी आरोपी भोसले व पवार या दोघांनी फिर्यादी व त्यांच्या मित्रांना स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून तेरामैल चौक येथे बोलावून घेतले.
त्यानंतर एक किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर धारदार शस्त्राने गडाळे यांच्या हातावर वार केले व त्यांच्या खिशातील १० हजार ३०० रुपये लुटले. तसेच अभिषेक यांची दुचाकी ( केए २८ ईयू १३०६ ) हीदेखील आरोपींनी जबरदस्तीने काढून घेतली.
त्यानंतर आरोपींनी पलायन केले. या प्रकरणी सहाजणांविरुद्ध मंद्रूप पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे. फौजदार गणेश पिंगुवाले हे अधिक तपास करीत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज