मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
मरवडे येथे अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामांचा शुभारंभ
मरवडे ग्रामपंचायतीच्या तरुण पदाधिकारी मंडळींनी शासनाच्या सर्व योजनांचा अभ्यास करुन अनेक लोकोपयोगी कामे हाती घेतली आहेत. त्यांच्या या धडपडीला बळ देण्यासाठी मतदार संघाचा लोकप्रतिनिधी म्हणून आपण मरवडे ग्रामपंचायतीला भरघोस शासकीय निधी उपलब्ध करुन देऊ अशी ग्वाही आ.भारतनाना भालके यांनी दिली.
मरवडे ग्रामपंचायतीच्या वतीने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून गावातील अंतर्गत पाणी पुरवठा वितरिका योजनेचा शुभारंभ आ.भालके यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी आ.भारत भालके यांनी रस्ते , वीज , पाणी पुरवठा सुविधा , जलसंधारण , पर्यावरण या सर्वच क्षेत्रात मरवडे ग्रामपंचायतीने केलेले कार्य कौतुकास्पद असून मरवडे गावात झपाट्याने सुरु असलेल्या विकास कामांना बळ देण्यासाठी भरीव शासकीय निधी उपलब्ध करुन देऊ अशी ग्वाही दिली.
1980 च्या दशकात मरवडे येथे नळ पाणी पुरवठा योजना राबविण्यात आली होती. गावच्या भौगोलिक रचनेत झालेला बदल, वितरिकेमध्ये ठिकठिकाणी निर्माण झालेले दोष , पुरेशा दाबाने गावाच्या सर्व भागातील नागरिकांना पाणी पुरवठा करताना येत असलेल्या अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून 48 लाख रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमुळे गाव तसेच वाडीवस्तीवरील कुटुंबांना पुरेशा दाबाने स्वच्छ पाणी पुरवठा होण्याच्या मार्ग प्रशस्त झाला आहे.
त्याचबरोबर मरवडे ग्रामपंचायतीच्या वास्तूचे सुशोभिकरण नुकतेच करण्यात आले आहे. त्याचेही उदघाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. फरशीकरण, रंगरंगोटी, पी.ओ.पी. , प्रसाधनगृह , वातानुकूलित कक्ष निर्मिती , सोलर विद्युत पुरवठा या सुविधा निर्माण करण्यात आल्या असून परिसरामध्ये आकर्षक वृक्ष संवर्धन करण्यात आले आहे. या सर्वच बाबींचे आ. भालके यांनी कौतुक केले.
यावेळी सोलापूरचे माजी उपमहापौर लालसिंगजी रजपूत, तालुका काॅग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश कोळेकर, डाॅ. आप्पासाहेब पुजारी , छत्रपती परिवाराचे संस्थापक सुरेश पवार,ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे उपअभियंता कमळे, माजी सरपंच अशोकभाऊ पवार , दामाजी शुगरचे माजी संचालक नामदेव गायकवाड,महादेव मासाळ ,डाॅ. राजेंद्र जाधव, साहेबराव पवार , सुभाष भुसे, मेजर रमेश शिंदे,दौलतराव शिंदे, आश्विनी कन्स्ट्रक्शनचे आबासाहेब पवार यांच्यासह मरवडे ग्रामपंचायतीचे सर्व पदाधिकारी, ग्रामविकास अधिकारी जे. पी .भांडे,सर्व कर्मचारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज