मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । सोलापूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक धार्मिक स्थळे एकतीस मार्च २०२० पर्यंत दर्शनासाठी बंद ठेवण्याचे संबंधित देवस्थानांच्या प्रमुखांनी मान्य केले असल्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे सांगितले.
कोरोना विषाणूच्या संसर्गला प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज जिल्ह्यातील देवस्थानच्या प्रमुखांशी बैठकीत चर्चा केली. या चर्चेदरम्यान सर्व सार्वजनिक धार्मिक स्थळे आणि देवस्थान प्रमुखांनी दर्शन 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे मान्य केले. जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक झाली.
धार्मिक स्थळातील विधी आणि नित्योपचार सुरु राहतील. पण हे करतांनाही आरोग्य विभागानी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी धार्मिक स्थळांच्या प्रमुखांना केले. यावेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूर, स्वामी समर्थ अन्न छत्र मंडळ, स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिर, अक्कलकोट, मारुती मंदिर, गौडगाव, दर्गाह, हैदरा, सिदेश्वर मंदिर देवस्थान यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
लोकांनी गर्दी करु नये, लग्न, कौटुंबिक समारंभ गर्दी न करता करावेत किंवा शक्य असल्यास लांबणीवर टाकावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. बाजारसमितीतील व्यवहार तीन सत्रात करावेत अशा सूचना बाजार समितीच्या पदाधिका-यांना दिल्या असून त्याची कार्यवाही सूरु होईल, असे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज