टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पंढरपूरचे नेते अभिजित पाटील यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, आमदार रोहित पवार हे सोलापूर जिल्ह्यात असताना पंढरपूरमधील विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे.
थकीत कर्जाप्रकरणी महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंकेने कारखान्यावर कारवाई केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
राज्य सहकारी बॅंकेचे मुद्दल आणि त्यावरील व्याज असे एकूण 430 काेटी रुपये थकवल्याप्रकरणी राज्य सहकारी बॅंकेचे प्राधिकृत अधिकारी तथा सहायक व्यवस्थापक कैलास घनवट यांनी तक्रारीनुसार विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल झाला होता.
राज्य सहकारी बॅंकेच्या कारवाईच्या विरोधात अभिजित पाटील हे पुणे येथील डीआरटी न्यायालयात सुनावणी सुरू होती. डीआरटी न्यायालयाने सुनावणीमध्ये कारवाईला दिलेली स्थगिती उठवली.
त्यानंतर तातडीने आज (ता. २६ एप्रिल) बँकेच्या अधिकाऱ्यांनी श्री विठ्ठल कारखान्यावर येऊन साखरेची सर्व गोदामे सील केली आहेत. पोलिस बंदोबस्तात साखर कारखाना जप्त करण्याची कार्यवाही केली आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेले अभिजित पाटील हे सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघात सक्रीय आहेत. ते आज करमाळ्यात शरद पवार यांच्या सभेला उपस्थित होते. त्याचवेळी राज्य सहकारी बॅंकेने (शिखर बॅंक) विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई केली आहे,
त्या मुळे अभिजित पाटील हे सभा अर्धवट सोडून पंढरपूरमध्ये दाखल झाले होते. या कारवाईमुळे अभिजित पाटील आणि त्यांच्या समर्थकांना धक्का बसला आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
गोडाऊनमध्ये एक लाख पोती साखर
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना लि., वेणूनगर-गुरसाळे, कारखान्याच्या ३ गोडाऊनला द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या अधिकाऱ्यांनी सिल केले आहे. गोडाऊनमध्ये जवळपास एक लाख पोती साखर आहे.
द महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे कारखान्यावर जवळपास 435 कोटी रुपयांचे थकीत कर्ज आहे. सभेत रोहित पवार यांनी आपल्या भाषणात कारखान्यावर कारवाईची भीती व्यक्त केली होती. त्याचप्रमाणे विठ्ठल कारखान्याचे गोडाऊन सिल झाले. कारखान्याच्या शटरला जाहीर ताबा नोटीस लावण्यात आली आहे.
विठ्ठल परिवार अडचणीत येऊ देणार नाही- अभिजित पाटील
श्री विठ्ठल सहकारी साखर कारखानाचे गोडाऊन सील झाले. त्यावरुन अभिजित पाटील यांनी नाराज व्यक्त केली. वेळप्रसंगी स्वतःला गहाण टाकू, पण विठ्ठल परिवार अडचणीत येऊ देणार नाही. पवार साहेबांशी चर्चा करून पुढील मार्ग काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज