मंगळवेढा टाईम्स न्युज ।
मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीवर मनोज जरांगे ठाम आहेत. त्यावर सरकार अद्याप कोणताही तोडगा काढू शकलेले नाही. मंत्रिमंडळ उपसमितीची बैठकही निष्फळ ठरली. उपोषणामुळे जरांगे यांची प्रकृती खालावल्याने आंदोलकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
त्यातच आजपासून कडक उपोषण करणार, पाणीही पिणार नाही, असा इशारा जरांगे यांनी दिला. त्यामुळे आंदोलन चिघळण्याची शक्यता आहे.
दरम्यान, आरक्षणासाठी त्यांनी सरकारला पर्यायही सुचवला. ज्या 58 लाख मराठ्यांकडे कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांचा जीआर काढा. ज्यांच्याकडे नोंदी सापडल्या नाहीत, त्यांची कुणबी ही उपजात समजून त्यांना आरक्षण द्या, असे जरांगे म्हणाले.
आझाद मैदानात उपोषणाला बसलेले मनोज जरांगे यांना विविध पक्ष आणि संघटनांचा पाठिंबा वाढत आहे. आज तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि आझाद मैदान परिसरात मराठय़ांचे तुफान आले होते.
आंदोलकांची संख्या सातत्याने वाढत असल्याने सरकारलाही धडकी भरली आहे. जरांगे यांच्या उपोषणाचा काल तिसरा दिवस होता. सरकार ऐकत नाही, आरक्षणावर अद्याप तोडगा काढलेला नाही, त्यामुळे उपोषण आणखी कडक करणार, असे जरांगे यांनी सांगितले.
समिती मार्ग का काढत नाही
”काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी बैठक झाली. त्यांनी मराठा आरक्षण उपसमितीला तातडीने मार्ग काढा असे आदेश दिल्याचे ऐकले. मग समिती मार्ग का काढत नाही,” असा सवाल करतानाच, बस्स झाल्या आता बैठका, असा निर्वाणीचा इशाराही जरांगे यांनी सरकारला दिला.
”मराठा तरुणांनी शांत रहावे. समाजाला मान खाली घालावी लागेल असे पाऊल उचलू नये. सरकारने कितीही अन्याय-अत्याचार केला तरी आरक्षण घेतल्याशिवाय मी मुंबई सोडत नसतो, हा माझा शब्द आहे,” असा विश्वास जरांगे यांनी या वेळी दिला.
काही लोकांनी समाजाला मदत करण्याऐवजी आंदोलनाच्या निमित्ताने रेनकोट, छत्र्या विकण्याचा धंदा सुरू केला आहे, असे समाजाच्या नावाने पैसे गोळा करू नका, मराठा तरुणांनी त्यांच्याकडून काहीही घेऊ नये, एक रुपयाही देऊ नये, असे आवाहनही जरांगे यांनी केले.
सुप्रिया सुळे यांना मराठा आंदोलकांचा घेराव
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे काल मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आझाद मैदानात गेल्या होत्या. जरांगे यांची भेट घेऊन त्या परतत असताना मराठा आंदोलक आक्रमक झाले. त्यांनी सुप्रिया सुळे यांना घेराव घातला. त्यांची गाडी अडवून धरली. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना बरेच प्रयत्न करावे लागले.
विशेष अधिवेशन बोलवून प्रश्न मार्गी लावा
राज्य सरकारने तातडीने एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अशी आपली मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना विनंती असल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. सरकारला करायचे असेल तर काहीच अवघड नाही. मराठा समाजाला आरक्षण द्यायला कुणाचाच विरोध नाही, असे त्या म्हणाल्या.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज