टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली असून यामुळे या दोन्ही तालुक्यात करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे.यामुळे येथील जनतेमध्ये भीतीचे वातावरण आहे. यासाठी सोलापूर जिल्ह्यसाठी मंजूर लसी पैकी पन्नास टक्के लसीकरण पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यात करावे, अशी मागणी आ. प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
याबाबतचे पत्र आ.परिचारक यांनी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व आरोग्य मंत्री यांना मेलद्वारे पाठविले आहे. यामध्ये आमदार प्रशांत परिचारक यांनी दोन्ही तालुक्यातील करोना रुग्णांच्या वाढीचा उल्लेख केला आहे. सोलापूर जिल्ह्यत सर्वाधिक करोना रूग्ण पंढरपूर तालुक्यात आढळून आले आहेत.
आज पर्यंत एकूण ११ हजार ३०० जणांना कोरोना झाला असून २६४ जणांचा यामुळे जीव गेला आहे.दरम्यान पंढरपूर—मंगळवेढा विधानसभेची पोटनिवडणूक नुकतीच पार पडल्यामुळे लोकांचा एकमेकाशी मोठय़ा प्रमाणात संपर्क आला आहे.
याचा परिणाम म्हणजे केवळ मागील सात दिवसात एक हजारहून अधिक रुग्ण पंढरपूर शहर व तालुक्यात आढळून आले आहेत.करोना आटोक्यात आणण्यासाठी प्रशासन उपाययोजना करीत असले तरी वेगाने लसीकरण होणे गरजेचे आहे.
यासाठी सोलापूर जिल्ह्यस मंजूर लसी पैकी पन्नास टक्के लसी पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यास मिळाव्यात, अशी मागणी आ.परिचारक यांनी केली आहे.
या दोन तालुक्यात लस कमी प्रमाणात येत असल्याने नागरिक आरोग्य केंद्रामधून माघारी जात आहेत. यासाठी पंढरपूर व मंगळवेढा येथे दोन लसीकरण केंद्र वाढवावेत व जास्तीतजास्त लस उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी आमदार प्रशांत परिचारक यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज