टीम मंगळवेढा टाईम्स ।
संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा अर्थातच कार्तिकी वारीसाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रसार वाढू शकतो.
त्याच पार्श्वभूमीवर आळंदीसोबत परिसरातील अकरा गावांत ६ ते १५ डिसेंबर या कालावधीत संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जारी केले.
तसेच कार्तिकी वारीतील मुख्य कार्यक्रम मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडणार आहेत.आळंदीत संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा, कार्तिकी वारी कार्तिकी वद्य अष्टमी ८ डिसेंबरपासून ते कार्तिक वद्य त्रयोदशी १३ डिसेंबरपर्यंत चालणार आहे.
त्यासाठी श्री विठ्ठल, संत नामदेव महाराज, संत पुंडलिक महाराज या तीन मानाच्या दिंड्यांना राज्य सरकारने प्रत्येकी वीस वारकऱ्यांसोबत आळंदीत प्रवेश करण्यासाठी परवानगी दिली आहे.
या तिन्ही मानाच्या दिंड्या ८ डिसेंबरला परिवहन महामंडळाने (एसटी) आळंदीत दाखल होतील.
दरम्यान, संचारबंदी काळात इंद्रायणी नदीत स्नान करण्यास बंदी घालण्यात आली आहे. वारीदरम्यान कीर्तन, जागर, माउलींच्या समाधीवरील नित्योपचार पूजा करण्यास अटी-शर्तींसह मंजुरी देण्यात आली आहे.
माउलींच्या महाद्वारातील गुरू हैबतबाबा पायरीपूजन चालीरीतीनुसार होणार असून, या पूजेस ५० जणांना उपस्थित राहण्यासाठी परवानगी दिली आहे, तर अन्य कार्यक्रमांना केवळ २० ते ३० जणांची उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज