टीम मंगळवेढा ऑनलाईन।
गेल्या आठ महिन्यांपासून बंद असलेले थिएटर्स अखेर उद्यापासून उघडणार आहेत. राज्य सरकारने अनलॉकच्या नव्या नियमावलीत थिएटर्स उघडण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे थिएटर्स मालक आणि बॉलिवूडकरांना दिलासा मिळाला आहे.
उद्यापासून म्हणजेच 5 नोव्हेंबरपासून राज्यातील थिएटर्स उघण्यात येतील. मात्र, सध्या फक्त 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.
अनलॉक – 5मध्ये सरकारने राज्यातील हॉटेल, रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, त्यासाठी सोशल डिस्टन्सिंग आणि मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं लागणार आहे. तसेच, कंटेन्मेंट झोनमध्ये या सर्व गोष्टींना बंदी कायम राहणार असल्याचंही राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आलं आहे.
राज्य सरकारने आज एक आदेश जारी केला आहे (Unlock 6 Guidelines). त्यानुसार, कंटेन्मेंट झोन वगळता राज्यात सिनेमा हॉल, मल्टिप्लेक्स आणि नाट्यगृहे सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी 50 टक्के प्रेक्षक क्षमतेची अट घालण्यात आली आहे.
शिवाय कंटेन्मेंट झोनमधील थिएटर आणि सिनेमागृहांवरील बंदी कायम ठेवण्यात आली आहे. सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि मल्टिप्लेक्स उघडताना राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं बंधनकारक करण्यात आलं आहे.
स्विमिंग पूल सुरु, पण…
राज्य सरकारने कंटेन्मेंट झोन वगळून इतर ठिकाणी जलतरण तलाव सुरू करण्यास परवानगी दिली आहे. मात्र, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील जलतरणपटूंनाच तूर्तास तरी त्याचा लाभ घेता येणार आहे. शिवाय सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाबाबतच्या नियमांचं पालन करावं लागणार आहे.
योगालाही परवानगी
कंटेन्मेंट झोनबाहेरच्या योगा इन्स्टिट्यूटला सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. उद्या 5 नोव्हेंबरपासून योगा प्रशिक्षण केंद्रे सुरू होणार असून त्यांनाही नियमांचं पालन करणं बंधनकारक राहणार आहे.
बॅडमिंटन, टेनिस बिनधास्त खेळा, पण…
राज्य सरकारने बॅडमिंटन, टेनिस, स्क्वॅश आणि शुटिंग रेंजच्या इनडोअर खेळास परवानगी दिली आहे. उद्यापासून इनडोअर बॅडमिंटन आणि टेनिस खेळता येणार आहे. त्यासाठीही नियमांचं पालन आवश्यक असेल असं सरकारी आदेशात नमूद करण्यात आलं आहे.(tv9)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज