टीम मंगळवेढा टाईम्स ।
कौटुंबिक वादामुळे माहेरी गेलेल्या पत्नीला परत आणण्यासाठी गेलेल्या पतीला सासुरवाडीत लोखंडी पाईप, वेळूची काठी तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत त्याच्या हाताचे हाड मोडल्याची घटना सरकोली येथे घडली. याप्रकरणी जखमीची पत्नी, सासू, सासरा व मेहुणा अशा चौघांविरूद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.
राहूल महादेव सावळे (वय ३१, रा) सरकोली असे जखमीचे नांव आहे. त्यांच्या फिर्यादीनुसार पत्नी अंजली राहूल सावळे, सासरा बाळू रामचंद्र हाबळे, सासू सीमा बाळू हाबळे व मेहुणा रविराज बाळू हाबळे (सर्व रा. सरकोली) अशी गुन्हा दाखल झालेल्या चौघांची नावे आहेत.
यातील राहूल यांचे लग्न ७ वर्षांपूर्वी गावातीलच अंजली हिच्याशी झाले होते. गेल्या १५ दिवसांपासून पती-पत्नीत वाद होऊ लागल्याने अंजली ही माहेरी निघून गेली. दि. १८ जानेवारी रोजी राहूल हे पत्नीला परत घेऊन येण्यासाठी सासुरवाडीत गेले.
मात्र, ‘तू आमच्या दारात कशाला आला’, असे म्हणून सासरा बाळू हाबळे याने शिवीगाळ करीत लोखंडी पाईप राहूल यांच्या डोकीत जोरात मारली. याचवेळी मेहुणा रविराज याने वेळूची काठी आणून त्यांच्या हातावर, पायावर जबर मारहाण सुरू केली.
यात रविराज हे खाली पडले असताना पत्नी अंजली व सासू सीमा या दोघांनी पळत येऊन त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. कांही वेळात राहूल यांचे वडील महादेव सावळे व कुमार सावळे हे त्या ठिकाणी आले.
त्यांनी भांडण सोडवून जखमी राहूल यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, अधिक मार लागल्याने त्यांना सोलापूर शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी डाव्या हाताचे हाड फॅक्चर झाल्याचे सांगितले.
सासूही रूग्णालयात
दरम्यान, राहूल सावळे यांची सासू सीमा बाळू हाबळे (वय ४६ ) यांनीही फिर्याद दाखल केली आहे. सीमा व पती बाळू हाबळे हे मोटारसायकलवर राहूल यांच्या घरासमोरून निघाले होते.
यादरम्यान, आपल्या पत्नीला सोडचिठ्ठी देण्यास सांगा, असे म्हणत त्याने सदर दोघांना शिवीगाळ केली. तसेच त्यांचीच मोटारसायकल घेऊन गेला. त्यानंतर दुपारी घरी येऊन पत्नी अंजली हिस काठीने मारहाण करू लागला.
यावेळी मध्ये आल्याने सासू सीमा यांना वेळूच्या काठीने कमरेवर, पाठीवर जबर मारहाण केली. त्यामुळे त्यांना येथील खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले, असे नमूद करण्यात आले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज