टीम मंगळवेढा टाईम्स।
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातील पुरावे असलेले फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्र सुन्न झाला होता.
वाल्मिक कराडच्या गँगने संतोष देशमुख यांना क्रूरपणे मारहाण केल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
या प्रकरणी अखेरीस राष्ट्रवादीचे मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. आता अधिकृतरित्या धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून सुट्टी झाली आहे. राज्यपालांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तसंच ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिफारशीवरून राज्यपालांनी मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे. आज सकाळी धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला होता.
विशेष म्हणजे, त्याआधी सोमवारी संध्याकाळी संतोष देशमुख यांच्या हत्येच्यावेळीचे फोटो व्हायरल झाले होते. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवगिरी बंगल्यावर जाऊन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान, धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा फैसला झाला होता.
धनंजय मुंडेंनी दिलं प्रकृती ठीक नसल्याचं कारण
सकाळी अधिवेशनाच्या आधीच धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि आपला राजीनामा दिली. त्यानंतर धनंजय मुंडेंनी ट्वीटकरून राजीनामा देण्याचं कारण सांगितलं.
‘बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येतील आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी, ही माझी पहिल्या दिवसापासूनची ठाम मागणी आहे. काल समोर आलेले फोटो पाहून तर मन अत्यंत व्यथित झालं, असं धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून आरोपपत्र न्यायालयात दाखल झाले आहे. तसंच, न्यायालयीन चौकशीही प्रस्तावित आहे. माझ्या सदसद् विवेक बुद्धीला स्मरून आणि मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने पुढील काही दिवस उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
त्यामुळे वैद्यकीय कारणास्तव सुद्धा मी मंत्रिमंडळातून माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा मुख्यमंत्री महोदयांकडे दिला आहे, असं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.
राज्यभरात संतापाचं वातावरण
संतोष देशमुख यांची आरोपींनी अत्यंत क्रूरपणे हत्या केली, त्यांच्या हत्येचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात संतापाची लाट पसरली आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी तो स्वीकारला आहे. दरम्यान आता धनंजय मुंडे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज