टीम मंगळवेढा टाईम्स ।
गुढीपाडवा, अक्षय्यतृतीया, दसरा, दिवाळी पाडवा हे साडेतीन मुहूर्तांचे शुभदिवस आहेत. गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक त्यामुळे नवीन उद्योगाचा, व्यवसायाचा शुभारंभ करण्यास हा उत्तम मुहूर्त समजला जातो.
यामध्ये नूतन संवत्सराची सुरुवात करणारा म्हणून हा एक महत्वाचा शुभदिवस मानला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्या नवीन वर्षाची सुरुवात होते. या दिवशी आज सकाळी घरोघरी गुढ्या उभ्या करुन, तोरणे लावून नवीन वर्षाचे स्वागत केले जाते.
ग्रहांवर आधाररत कालगणना पंचांगाच्या माध्यमातून आपल्याला कळते म्हणून संवत्सरारंभाच्या दिवशी गुढीबरोबर पंचांगावरील गणपतीचे पूजन करावयास सांगितले आहे.
गुढी उभी करण्यासाठी आपण जी काठी वापरणार आहोत ती स्वच्छ धुवून, पुसून घ्यावी. त्याला रेशमी वस्र बांधून त्यावर एखादे चांदीचे भांडे किंवा घरातील कोणतेही स्वच्छ भांडे ठेवावे.
गुढीला कडुनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या
बांधाव्यात, साखरेची माळ घालावी. जिथे गुढी उभी करावयाची आहे ती जागा स्वच्छ करुन रांगोळी काढावी.
अंघोळ करुन त्या जागी गुढी बांधावी व हळद, कुंकू, फुले वाहून तिची पूजा करावी. ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिलेली असल्याने या गुढीलाच ब्रह्मध्वज असेही म्हटले जाते. म्हणून ब्रह्मध्वजाची पुढील मंत्राने प्रार्थना करावी.
ब्रह्मध्वज नमस्तेSस्तु सर्वभिष्ट फलप्रद ।
प्राप्तेSस्मिन्वत्सरे नित्यं मद्गृहे मंगलं कुरु ।।
ही प्रार्थना झाल्यावर पंचांगाचे पूजन करुन नवीन वर्षाचे पहिल्या दिवसाचे पंचांग वाचावे. त्यानंतर कडुनिंब, गूळ, जिरे आदी घालून केलेले कडुनिंबाचे पाणी घ्यावे. त्यानंतर वर्षभरातील महत्वाच्या घटना पिक-पाणी यांची माहिती करुन घ्यावी.
सकाळी लवकर गुढी उभी करावी आणि सूर्यास्ताचे सुमारास नमस्कार करून ती पुन्हा उतरवून ठेवावी.
शके १९४६, क्रोधी संवत्सराविषयी काही : 8 एप्रिल रोजी म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सूर्यग्रहण असले तरी ते भारतात दिसणार नसल्याने त्याचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही.
तसेच पाडव्याच्या दिवशी वैधृति योग असला तरीही साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला पाडव्याचा दिवस शुभच आहे. सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात एकूण 3 गुरुपुष्यामृत योग आहेत.।
यावर्षी 6 मे ते 25 जून शुक्राचा अस्त असून 8 मे ते 1 जून या कालावधीत गुरूचा अस्त आहे. त्यामुळे 8 मे ते 1 जून या कालावधीत एकत्रितपणे गुरु व शुक्राचा अस्त असल्याने कोणत्याही मंगलकार्याकरिता मुहूर्त नाहीत. 29 मार्च 2025 पर्यंत शनि कुंभ राशीत असणार असून मकर, कुंभ आणि मीन या राशींना साडेसाती आहे.
या वर्षी ज्येष्ठ महिन्यात 25 जून रोजी अंगारक चतुर्थीचा योग आहे. यावर्षी केरळ किनारपट्टीवर
मान्सूनचे आगमन वेळेवर होईल असे दिसते. महाराष्ट्रात 10 जून पासून मान्सूनची सुरुवात होईल.
विशेषत: जुलै, ऑगस्टमध्ये पाऊस समाधानकारक होईल. एकंदरित सरासरीइतका किंवा थोडा अधिक पाऊस होईल असे दिसते.
या वर्षातील काही प्रमुख दिवस –
गुढीपाडवा – 9 एप्रिल, मंगळवार
अक्षय्य तृतीया – 10 मे, शुक्रवार
आषाढी एकादशी – 17 जुलै, बुधवार
गणेशोत्सव – 7 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर
घटस्थापना – 3 ऑक्टोबर, गुरुवार
दसरा – 12 ऑक्टोबर, शनिवार
नरक चतुर्दशी – 31 ऑक्टोबर, गुरुवार
लक्ष्मीपूजन – 1 नोव्हेंबर, शुक्रवार
दिवाळी पाडवा – 2 नोव्हेंबर
भाऊबीज – 3 नोव्हेंबर
कार्तिंकी एकादशी – 12 नोव्हेंबर, मंगळवार
दत्तजयंती – 14 डिसेंबर
मकर संक्रांत – 14 जानेवारी, मंगळवार
महाशिवरात्री – 26 फेब्रुवारी, बुधवार
साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ दिवस आणि नववर्षाचा आरंभ दिन म्हणून गुढीपाडव्याचे महत्व अबाधित राहणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा पाडव्याचा मुहूर्त आणि गुढीपाडव्यापासून सुरु होणारे नवीन संवत्सर
सुखाचे जावो ही सर्वांना शुभेच्छा !
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज