टीम मंगळवेढा टाईम्स।
मुंबई पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आलेले परमबीर सिंग नाराज असून, पदभार न घेताच ते रजेवर गेले आहेत. अचानक त्यांच्याकडून पदभार काढून घेण्यात आल्यामुळे नाराज झालेले परमबीर सिंग हे स्वेच्छानिवृत्ती घेण्याच्या पवित्र्यात असल्याचं समजते.
दरम्यान, त्यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मोठा आरोप केला आहे. अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते असा मोठा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी अनिल देशमुख यांनी सचिना वाझे यांना दर महिन्याला बार, रेस्तराँ आणि अन्य आस्थापनांमधून १०० कोटी रूपये गोळा करण्यास सांगितले होते, असा धक्कादायक आरोप त्यांनी या पत्रातून केला आहे.
गेल्या १३ महिन्यांपासून परमबीर सिंग हे मुंबई आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत हाेते. अंबानी यांच्या निवासस्थानाजळव सापडलेली स्फोटकं कार, त्यानंतर मनसुख हिरेन यांच्या कथित आत्महत्याप्रकरण यावरुन उठलेल्या गदारोळामुळे परमबीर सिंग अडचणीत आले आहेत.
आयुक्तपदावरुन त्यांची उचलबांगडी करण्यात आल्यानंतर आता याप्रकरणी त्यांची चौकशीही होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांची बुधवारी तडकाफडकी बदली केल्याचे सूत्रांनी सांगितलं.
आरोपांवर काय म्हणाले देशमुख ?
मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाजे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त श्री परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे अशी प्रतिक्रिया यानंतर अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिली.
काय आहेत पत्रातील मुद्दे?
मार्च महिन्याच्या मध्यात वर्षा बंगल्यावर मी तुमची भेट घेतली. त्या ठिकाणी अँटिलियाच्या केसबद्दल पूर्ण माहिती देत होतो. त्याचवेळी मी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कामाबद्दल तुम्हाला कल्पना दिली.
इतकंच नाही तर अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या चुकीच्या कृतीबद्दलही माहिती दिली. परंतु त्या ठिकाणी असलेल्या अन्य मंत्र्यांना याची पूर्वीपासूनच कल्पना असल्याचं निदर्शनास आल्याचं त्यांनी पत्रात म्हटलं.
सचिन वाझे हे क्राईम इंटेलिजन्स युनिट हेड करत होते. गेल्या अनेक महिन्यात देशमुख यांनी वाझे यांना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलावलं आणि दरमहा १०० कोटी जमा करण्यास सांगितली. फेब्रुवारी महिन्यात त्यांनी वाझेंना हे सांगितलं.
त्यावेळी त्यांचे वैयक्तीक सेक्रेटरी पलांडे आणि घरातील काही स्टाफदेखील हजर होते. हे पैसे गोळा करण्यासाठी काय करायचं हेदेखील त्यांनी वाझेंना सांगितलं.
मुंबईत १७५० बार आणि रेस्तराँ आहेत त्यातल्या प्रत्येकाकडून दोन तीन लाख गोळा केले तरीही महिन्याला चाळीस पन्नास कोटी होतील. राहिलेली अन्य रक्कम इतर ठिकाणाहून गोळा करता येईल, असंही त्यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज