टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्याचे लसीकरणाचे उद्दीष्ट हे 34 लाख 14 हजार चारशे इतके असून आजपर्यंत पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी 80 तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची टक्केवारी 42 आहे.
आज पर्यंत सुमारे साडेसहा लाख नागरीकांनी पहिला डोस घेतलेला नाही. त्यातील 18 ते 45 वयोगटातील नागरिकांची संख्या अंदाजे 60 टक्के पर्यंत आहे .
त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या अधिनस्त असलेल्या सर्व महाविद्यालयातील 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण झाले पाहिजे, असे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरणाच्या अनुषंगाने आयोजित विद्यापीठातील सर्व संबंधित विभागप्रमुख व अधिनस्त सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व मेंटर्सच्या बैठकीत जिल्हाधिकारी शंभरकर मार्गदर्शन करत होते.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार उपस्थित होत्या. जिल्हाधिकारी शंभरकर पुढे म्हणाले की, 18 ते 45 वयोगटातील नागरिकच मोठ्या प्रमाणावर बाहेर फिरतात. त्यामुळे ते कोरोनाबाधित झाल्यास संपूर्ण कुटुंबाला संसर्ग होण्याची शक्यता असते.
हे नागरिक उपचाराने कोरोनामुक्त होतात. परंतु घरातील ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांच्या मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते.
त्यामुळे बाहेर फिरणाऱ्या 18 ते 45 वयोगटातील नागरिकांचे 100 टक्के लसीकरण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्या अनुषंगाने महाविद्यालय स्तरावरून 18 वर्षे पूर्ण करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचे लसीकरण झाले पाहिजे.
यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य व मेंटर्स यांनी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करून त्यांचे लसीकरण करून घ्यावे, अशी सूचना जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
मागील काही दिवसांपासून लसीकरण करून घेण्याच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे.
परंतु जिल्ह्याचे पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांचे प्रमाण शंभर टक्के झाले पाहिजे, यासाठी सर्व नागरिकांनी स्वतःहून सहकार्य करावे.
प्रशासनाने लसीकरणाबाबत योग्य ती उपाययोजना केल्या असून जिल्ह्यात जवळपास चारशे ठिकाणी शासकीय स्तरावर लसीकरण केंद्र तर 25 ठिकाणी खाजगी लसीकरण केंद्र सुरू आहेत.
तसेच मोबाईल व्हॅन व आरोग्य पथक घरो घरी जाऊन लसीकरण करत असल्याने जिल्ह्यातील सर्व संबंधित नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला लसीकरणासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शंभरकर यांनी केले.
लस न घेतलेले नागरिक घराबाहेर फिरु नयेत व त्यांनी स्वतःचे लसीकरण करून घ्यावे यासाठी पेट्रोल पंपावरही लसीकरणाचे दुहेरी प्रमाणपत्र असल्याशिवाय पेट्रोल दिले जाणार नाही, असे जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंप चालकांना कळविलेले आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झालेली आहे.
कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण हाच एक प्रभावी व एकमेव उपाय आहे. त्यामुळे सर्व महाविद्यालयांनी त्यांच्याकडील सर्व विद्यार्थ्यांचे लसीकरण कशा पद्धतीने होईल.
याबाबत विद्यार्थ्यांचे त्यांच्या स्तरावरून प्रबोधन करून त्यांना लसीकरणात समाविष्ट करून घ्यावे, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सूचित केले.
विद्यापीठाच्या वतीने महाविद्यालयातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत लसीकरणाबाबत जनजागृती करून लसीकरण न केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याचे प्रबोधन करण्यासाठी अधिनस्त सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य व विद्यार्थ्यांचे मेंटर हे प्रयत्न करतील व त्यांनी केलेल्या कार्यवाहीचा अहवाल आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी विद्यापीठाला सादर करतील.
त्या अनुषंगाने विद्यापीठाच्या वतीने जिल्हा प्रशासनाला लसीकरणाचा अहवाल सादर केला जाईल व सर्व विद्यार्थ्यांचे 100 टक्के लसीकरण करून घेण्यासाठी विद्यापीठाच्या वतीने प्रशासनाला पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल, असे कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्ह्यातील काही महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर राबवलेल्या लसीकरण मोहीमेची माहिती दिली. यामध्ये श्रीपाद सुरवसे, रविकांत पाटील, सत्यजित शहा, रफिक नदाफ, बाळासाहेब लिंगे आदीचा समावेश होता.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज