टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. निवडणूक अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी तब्बल ७१ उमेदवारी अर्ज दाखल झाले.
यामध्ये सरपंचपदासाठी १६, तर सदस्यांसाठी ५५ अर्ज दाखल झाले. उमेदवारी अर्ज, प्रमाणपत्रांची जमवाजमव करण्यासाठी इच्छुकांची दमछाक होताना दिसत आहे.
मंगळवेढा तहसील कार्यालयांत उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गर्दी होत आहे. १८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे.
तहसील कार्यालयात ग्रामपंचायतनिहाय अर्ज स्वीकारले जात आहेत. जनतेतून १८ सरपंच आणि १५४ सदस्य अशा १७२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. गावनेत्यांकडून आपली ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.
अर्ज दाखल झालेली गावनिहाय संख्या
बावची सरपंचपदासाठी १. ढवळस सरपंचपदासाठी २, शिरनंदगी सदस्यांसाठी ७, मारोळी सरपंचपदासाठी २. सदस्यांसाठी १७, डोंगरगाव सरपंचपदासाठी २,
सदस्यांसाठी १७. हाजापूर सदस्यांसाठी १, येड्राव सरपंच पदासाठी १, मारापूर ३ सदस्यांसाठी ५. सोडी सरपंचपदासाठी २. सदस्यांसाठी ६. पाटखळ सरपंचपदासाठी ३, सदस्यांसाठी २ असे सरपंचपदासाठी १६ तर सदस्यांसाठी ५५ असे ७१ अर्ज दाखल झाले आहेत.
पहिल्या दिवशी सरपंच पदासाठी २ तर सदस्यांसाठी २४ अर्ज दाखल झाले होते. फटेवाडी, तळसंगी, गोणेवाडी, रहाटेवाडी, गुंजेगाव, खोमनाळ, भालेवाडी, पोट या ग्रामपंचायतसाठी अर्ज भरण्याच्या दुसऱ्या दिवशी एकही अर्ज दाखल झाला नसल्याची माहिती निवडणूक विभागाचे उमाकांत मोरे यांनी दिली.
अर्ज भरताना लागणारी १६ कागदपत्रे
ऑनलाइन निवडणूक अर्ज भरून त्याची प्रिंट काढून तहसील कार्यालयात द्यावी लागेल. मतदार यादीत उमेदवाराचे नाव ज्या पानावर आहे.
त्या पानाची सत्यप्रत, अनामत रकमेची पावती (राखीवसाठी १०० सर्वसाधारणसाठी ५०० रुपये), राष्ट्रीयीकृत बँकेत खाते, मालमत्ता, दायित्व घोषणापत्र, हयात अपत्ये दोनपेक्षा अधिक नसल्याबाबत स्वः घोषणापत्र, जात प्रमाणपत्र, रोजचा खर्च सादर करण्याबाबत हमीपत्र, उमेदवाराचे वय २१ वर्षे पूर्ण असल्याबाबत प्रमाणपत्र,
आधार कार्डाची झेरॉक्स, थकबाकीदार नसल्याचे प्रमाणपत्र, ग्रामपंचायत ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, शौचालय असल्याचे प्रमाणपत्र, शौचालय वापरत असल्याबाबत ग्रामसभेतील ठराव मंजुरीची प्रत आदी कागदपत्रे लागणार आहे. यामुळे कागदपत्रांची जुळवा-जुळव करणे ही मोठी बाब अडचणीची ठरत आहे.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज