टीम मंगळवेढा टाईम्स ।
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडात सामील झालेले सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
पक्ष सोडल्यामुळे अजित पवार यांचा आपल्यावरील राग अजून गेला नाही. अजित पवार सुडानेच पेटलेले असतात. त्यांच्या पाया पडलो. बुटाला हात लावला तरी त्यांची अढी काही जात नाही, अशी टीका शहाजी बापू पाटील यांनी केली.
तसेच अजित पवार यांच्यावर टीका करतानाच शहाजी बापू पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची तोंडभरून स्तुती केली. एकनाथ शिंदे आपल्याकडे मुलाच्या नजरेतून पाहतात.
तर फडणवीस आपल्याला भावासारखे आहेत, असं सांगातनाच शिंदे यांची कामाची पद्धत अप्रतिम आहे. कोणतीही ओळख पाळख नसताना, कोणतेही आढेवेढे न घेता ते काम करतात, असं शहाजी पाटील यांनी सांगितलं.
शहाजी बापू पाटील यांची त्यांच्या कार्यकर्त्यासोबतची एक ऑडिओ क्लिप व्हारल झाली आहे. त्यात त्यांनी अजित पवारांवर टीकास्त्रं सोडलं आहे.
गेल्या अडीच वर्षात या सरकारमध्ये काय काम झालं ते सांगा? शंकरराव चव्हाणांच्या हाताखाली मी काम केलं. त्यांनी मला कधी खाली झोपू दिलं नाही.
इतकं चांगलं नातं असताना त्या अशोक चव्हाणांनी एक तरी आपलं काम केलं का? त्या अजित पवारांचं वागणं पाहा. तो सुडानेच पेटला आहे हो. आपण राष्ट्रवादी सोडली म्हणून रागानेच बघतोय आपल्याकडे.
पाया पडतोय. बुटांना हात लावतोय. लगा मी तुझ्यापेक्षा वयाने मोठा हाय. तरी मी पाय धरून पाया पडतोय. कशासाठी मह्या मतदारसंघासाठी. मह्या लोकांसाठी, असं शहाजी बापू पाटील म्हणाले
काय जबराट नेतृत्व आहे शिंदे साहेबांचं
यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे याच्या नेतृत्वाची स्तुती केली. मी बघितलं रफिक भाय. काय जबराट नेतृत्व एकनाथ शिंदे साहेबांचं. अरे आपली ओळख नाय पाळख नाय.
पण त्या माणसाने आल्या आल्या तुम्ही गणपतरावांच्या मतदारसंघातून निवडून आलाय. काय बी अडचण सांगा… अशी विचारपूस केली. मला सांगा कोण म्हणतंय असं, असं ते म्हणाले.
मला भाषणाची संधीही दिली नाही
गणपतराव देशमुख यांच्या निधानानंतर भाषण करण्याची संधी मिळाली नाही. त्याची खदखदही त्यांनी व्यक्त केली. एवढी विचित्रं माणसं आहेत की, तुम्हीच टाईप केलीय पत्रं.
गणपतराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे लोकनेते आहेत. चळवळीतील लोक नेते आहेत. माझ्या मतदारसंघातील आहेत. त्यांच्या श्रद्धांजलीच्या भाषणातील संधी मला द्यावी म्हणून आपण पत्रं पाठवलं होतं.
तुम्हाला मी भाषणही करून दाखवलं होतं. साहेबांवर काय बोलणार सांगितलं होतं. पण यांनी मला संधी सुद्धा दिली नाही. अजित पवार यांनी पहिल्यांदा त्यानं श्रद्धांजली वाहिली. एकदा त्यानं आबांचं नाव घेतलं आणि दिलं सोडून. कोल्हापूरचा कोण वारला होता. त्याच्यावर बोलत बसलं, अशी टीका त्यांनी केलीय
मग मला तिकीट का दिलं?
अजित पवारांनंतर फडणवीस साहेब उठलं बोलायला. त्यांनी गणपतराव देशमुखांचं स्मारक करण्याची मागणी केली. तो बोलल्यानंतर बाळासाहेब थोरात बोलले. त्यांनी मागणी केली. मग हे (अजित पवार) तिसऱ्यांदा उठले.
अन् बोलायला लागले. आमचे गणपतरावांशी असे संबंध आहेत, तसे संबंध आहेत. साहेबांचे संबध आहेत असं सांगू लागले. त्यांच्याविरोधात आम्ही कुणाला उभाच करत नव्हतो. आरं त्यांच्या विरोधात उभं करत नव्हतो.
तर 1990ला तुम्हीच मला तिकीट दिलं. 1995ला तिकीट दिलं. मला कशाला तिथे खिंडीत उभं केलंत? आँ.. आबासाहेबांच्या श्रद्धांजलीच्या भाषणात नेमाने माझं भाषण व्हायला हवं होतं. या तिघांच्या भाषणाची काय गरज व्हती? असा सवाल त्यांनी केला.(स्रोत:TV9 मराठी)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज