मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
सांगली येथील सराफ व्यावसायिक हणमंत वसंत गायकवाड (रा. बुधगाव) यांच्या दुकानातून सुमारे 21 लाख रुपये किमतीची 700 ग्रॅम सोन्याची पट्टी लंपास झाली. याबाबतची तक्रार त्यांनी सांगली शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी या दुकानातील कामगार सुरेश निवृत्ती मस्के, संजय मस्के, लता मस्के आणि एकजण अशा चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी : गायकवाड यांचे येथील टिळक चौकाजवळील आयकॉन कॉम्प्लेक्समध्ये सराफी दुकान आहे. त्या ठिकाणी दागिने तयार केले जातात. सुरेश आणि संजय हे दुकानात कामाला होते. त्यांनी मालकाचा विश्वास संपादन केल्यामुळे दुकानातील कामाची सर्व जबाबदारी तेच पाहत होते.
दरम्यानच्या काळात दुकानात असलेली 700 ग्रॅम वजनाची सोन्याची पट्टी लंपास झालेली आहे. ही पट्टी सुरेश आणि संजय याने संगनमत करून लंपास केली असावी, असा संशय आहे. त्यातूनच गायकवाड यांनी सांगली शहर पोलिसात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी सुरेश आणि संजय त्याशिवाय लता मस्के आणि लताचा मामा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती सांगली शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर यांनी दिली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज