टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील रड्डे या गावात वाघ असल्याची अफवा वार्यासारखी पसरली त्यातच काल सायंकाळी बोकडाचे दोन तुकडे सापडले आहेत. बोकडाला तरस किंवा लांडगा यांनी ठार मारले असेल अशी माहिती वन विभागाने दिली आहे.
दरम्यान वाघ या परिसरात राहू शकत नाही त्यामुळे नागरिकांनी भीती बाळगू नये. तो वाघ नसून तरस आहे.
रड्डे गावाच्या दक्षिणेकडील बाजूला शिवशरण वस्तीवर प्रमोद शिवशरण यांच्या घराच्या पाठीमागे बांधलेल्या एका बोकडाला दुपारी तीन ते चार च्या दरम्यान त्या बोकडाचे दोन तुकडे करण्यात आलेले आहेत.
एक तर मागच्या दोन दिवसापासून वाघ आल्याच्या अफवेने संपूर्ण गावामध्ये आसपासच्या परिसरात घबराटीचे वातावरण असताना या झालेल्या घटनेमुळे अजूनही लोकांच्या मनामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
रड्डे येथील लोखंडे वस्ती परिसरात बुधवारी रात्रीच्या आसपास एका युवकाला दूध डेअरीत दूध घालून घरी परत जात असताना वाघसदृश प्राणी दिसून आल्याचे त्याने त्या वाडीवरील ग्रामस्थांना सांगितले. रात्रीची वेळ, वस्तीवर लाईट नसल्यामुळे अंधाराचे साम्राज्य होते. त्यातच वाघ दिसल्याची बातमी संपूर्ण गावामध्ये व परिसरात काही मिनिटांत वाऱ्यासारखी पसरल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले.
यामुळे ग्रामस्थांनी घराच्या छतावर बसून रात्र जागून काढली. घटनेची माहिती कळताच सरपंच संजय कोळेकर व गावातील काही ग्रामस्थांनी वस्तीवर जाऊन नागरिकांना घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन केले.
खात्री करून घेण्यासाठी तातडीने वन विभागाशी संपर्क साधला असता वन विभागाचे काशीद, पोकळे या कर्मचाऱ्यांना तातडीने रात्रीच त्या ठिकाणी येऊन पाहणी करत सदर वस्ती परिसरात जागोजागी आढळलेल्या जनावरांच्या पायांचे ठसे घेऊन वरिष्ठांना पाठवून तपास केला. हे ठसे वाघाचे नसून तरसाचे असल्याची महिती वनविभागाच्या वतीने देण्यात आली.
मात्र गुरुवारी दिवसभर मंगळवेढा तालुक्याच्या दक्षिण भागातील नंदेश्वर, भोसे, शिरनांदगी आदी गावांमध्ये या भीतीपोटी अनेकांनी शेतात कामासाठी जाणे टाळले.
रड्डे परिसरात राहणाऱ्या युवकास वाघसदृश प्राणी निदर्शनास आल्याची माहिती मिळाली. तातडीने वन विभागाचे कर्मचारी पाठवून त्या प्राण्यांच्या पायांच्या ठशांचे फोटो पाठवले असता त्यावरून तो प्राणी वाघ नसून तरस असल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्राण्यापासून परिसरातील ग्रामस्थांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. तरस थेट माणसावर हल्ला न करता मेलेल्या प्राण्याचे मांस खात असते. यामुळे घाबरण्याचे काही कारण नाही. – सुभाष बुरुंगले, वनपरिमंडळ अधिकारी, मंगळवेढा
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज