टीम मंगळवेढा टाईम्स । पुणे पदवीधर मतदारसंघात निवडणुकीचे नगारे वाजण्यास सुरुवात झाली आहे. बिहार निवडणुकीबरोबर देशभरातील सर्व पोटनिवडणुका, तसेच विधान परिषदेसाठी कालावधी संपलेल्या निवडणुका घेणार असल्याचे संकेत निवडणूक आयोगाने दिले आहेत.
त्यामुळे राज्यातील मुदत संपलेल्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांमधील इच्छुकांची लगबग सुरू झाली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघाच्या सदस्यपदाची मुदत जुलै 2020 मध्ये संपली. त्यानंतर कोरोनामुळे या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या.
आता ही निवडणूक बिहार निवडणुकीच्या कालावधीत घेण्यात येईल असे संकेत निवडणूक आयोगाकडून दिले आहेत. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात या निवडणुकीची घोषणा आयोगाकडून केली जाईल अशी शक्यता आहे.
या मतदारसंघातील आमदार चंद्रकांत पाटील हे पुणे येथील कोथरुड विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते सारंग पाटील यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे.
त्यामुळे या मतदारसंघातील दोन्ही तगडे प्रतिस्पर्धी रिंगणातून बाहेर आहेत. त्यामुळे भाजप आणि महाविकास आघाडी यांमधून कोण उमेदवार असणार याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघावर भाजपचे वर्चस्व राहिले आहे; मात्र आता राज्यात त्यांची सत्ता नसल्याने आणि विरोधक एकवटल्याने भाजपला ही निवडणूक सोपी नाही.
सध्या भाजपकडून या निवडणुकीसाठी कोल्हापुरातून माणिक पाटील (चुयेकर), पुण्यातून राजेश पांडे, ऍड. सचिन पटवर्धन,नीता ढमाले व अपक्ष म्हणून निशा बिडवे,सोलापुरातून आमदार सुभाष देशमूख यांचा मुलगा रोहन देशमूख, कऱ्हाडमधून शेखर चरेगावकर यांच्या नावाची चर्चा आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून अरुण लाड यांचे नाव आघाडीवर असून त्यांनी यापूर्वीची निवडणूक अपक्ष लढवली होती. महाविकास आघाडीमुळे त्यांची दावेदारी प्रबळ मानली जात आहे. उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात पडणार हे प्रत्यक्ष उमेदवारीच्या घोषणेनंतरच कळेल.
पदवीधर नोंदणीचा पहिला टप्पा 1 ऑगस्ट ते 6 नोव्हेंबर 2019 या कालावधीत झाला. दुसरा टप्पा 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालवधीत पार पडला. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची नोंदणी सर्वाधिक 84 हजार 148 इतकी झाली आहे. त्यामुळे पदवीधर निवडणुकीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवार असेल तर याचा लाभ मिळण्याची शक्यता दाट आहे.
जिल्हानिहाय मतदार नोंदणी पुढील प्रमाणे (दोन टप्प्यातील)
सोलापूर – 38,745
कोल्हापूर – 84,148
सांगली – 79,496
सातारा – 53,218.
पुणे – 52,849
Pune Graduation elections coming soon, aspirants almost start
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज