टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूरचे बोरामणी विमानतळ सुरू करण्यासाठी आणि मंगळवेढा येथील नियोजित महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी निधी देऊ असे आश्वासन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी अंदाजपत्रकात घोषित केले. परंतु, त्यासाठी कोणतीच निधीची तरतूद करण्यात आली नाही.
शिवाय राज्यासाठी जाहीर केलेल्या अनेक प्रकल्प, तसेच घोषणांतून जिल्ह्यालाही निधी मिळेल; पण त्याचीही हमखास निश्चिती नाही. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने मांडलेल्या अंदाजपत्रकातून सोलापूर जिल्ह्यासाठी ‘बडा गम अन् थोडी खुशी’ असा प्रत्यय येत आहे.
कोरोना काळातील संर्घषानंतर 2021-22 या वर्षाचे राज्याचे अंदाजपत्रक पवार यांनी विधीमंडळ सभागृहात सादर केले.
गेल्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मंगळवेढा शहरातील महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यात येईल असे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात म्हटले आहे. त्यामुळे स्मारकाचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
मात्र यासाठी निधी दिला जाईल असे ठोस आश्वासन मात्र दिलं गेलं नाही. त्यामुळे निधी कधी मिळणार का नुसतीच घोषणा झाली हे येणाऱ्या काही दिवसात समजेल.
मंगळवेढा शहरात महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक व्हावे अशी मागणी नागरिकांमधून होत होती. मागील फडणवीस सरकारच्या काळात याबाबत तत्कालीन पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती निश्चित करण्यात आली होती.
या समितीकडून कृषी खात्याची 35 एकर जागा निश्चित करून 100 फुटांची मूर्ती, स्मारक परिसरामध्ये ग्रंथालय, ध्यानकेंद्र, अभ्यास केंद्र स्मारक, कृषी पर्यटन स्थळ, भक्त निवास, शेतकरी निवास, महात्मा बसवेश्वर यांची माहिती देणारे फलक आदींचा समोवश असलेला आराखडा निश्चित करण्यात आला होता.
या समितीने 151 कोटी खर्चाचा आराखडा बनवून तो सरकारला सादर केला होता. आमदार भारत भालके यांनी विधानसभेत याबाबत अनेक वेळा आवाजदेखील उठवला होता.
परंतु मागील सरकारच्या काळात या स्मारकाची देखभाल-दुरुस्ती करण्याची जबाबदारी कोणी घ्यायची यावरून हा प्रस्ताव परत आला होता.
नगरपालिकेने त्याबाबतचे पत्र दिले होते. परंतु ही जागा नगरपालिकेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर असल्याने याबाबतची जबाबदारी जिल्हाधिकाऱ्यांनी कृषी खात्याकडे केली असल्याचे समजते.
महाविकास आघाडी सरकारने महात्मा बसवेश्वर यांच्या स्मारकासाठी निधीची तरतूद केल्यामुळे भविष्यात पर्यटनाच्या संधी वाढून स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज