टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापुरातील 16 प्रवासी नोकरी तथा कामानिमित्त ब्रिटनला गेलेले परतले आहेत. त्यातील चारजण हैदराबादला तर चारजण आता पुण्यात आहेत. उर्वरित आठ व्यक्ती सोलापूर शहरात त्यांच्या घरी राहत आहेत.
28 दिवस त्यांना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर नियिमत वॉच ठेवला जात असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्याधिकारी डॉ.बिरूदेव दुधभाते यांनी बोलताना दिली.
सार्वजनिक आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा
इंग्लंडहून मागील काही दिवसांत सुमारे एक हजार 670 प्रवासी महाराष्ट्रात आले आहेत. त्यातील 16 प्रवासी सोलापूर शहरातील आहेत. त्यांची ‘आरटीपीसीआर’ टेस्ट निगेटिव्ह आली असून ते सर्वजण सोलापुरात दाखल झाले.
मात्र, त्यांना 28 दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांच्यावर संबंधित शहरातील आरोग्य विभागामार्फत वॉच ठेवणे बंधनकारक आहे.
परंतु, हे प्रवासी सोलापुरात येऊन आता 14 दिवस झाले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाने मात्र, त्यांच्या नावाची यादी महापालिकेस दोन दिवसांपूर्वी दिल्याचे महापालिकेतील आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
ब्रिटन (इंग्लंड) येथे कोरोनाचा दुसरा विषाणू सापडल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सावधगिरी बाळगायला सुरवात केली आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांवर विमानतळावरच वॉच ठेवला जात आहे. त्या प्रवाशांची कोरोनाची ‘आरटीपीसीआर’ चाचणी केली जात आहे.
पॉझिटिव्ह तथा संशयितांवर त्याचठिकाणी उपचार केले जात असून लक्षणे नसलेल्यांना त्यांच्या गावी पाठविले जात आहे. मात्र, त्यांना 28 दिवस होम क्वारंटाईन केले जात असून त्यांच्यावर तेथील स्थानिक आरोग्य यंत्रणेमार्फत वॉच ठेवला जात आहे. सोलापुरात आलेले सर्वजण वेगवेगळ्या कुटुंबातील असल्याचेही डॉ. दुधभाते म्हणाले.
दरम्यान, नागरिकांनी आरोग्याबद्दल संशय आल्यास तत्काळ तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. वेळेत निदान झाल्यास कोरोनाचा धोका होत नाही. तत्पूर्वी, सर्वांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन महापालिकेतर्फे करण्यात आले आहे.(सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज