टीम मंगळवेढा टाईम्स।
सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून हमीभावाने हरभरा खरेदी करण्यासाठी नाफेडतर्फे आजपासून नऊ खरेदी केंद्रे सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सोलापुरातील केंद्रावर उत्तर व दक्षिण सोलापुरातील शेतकऱ्यांचा हरभरा, कुर्डूवाडीच्या केंद्रावर माढ्यातील शेतकरी, मंगळवेढ्यातील केंद्रावर पंढरपूर व मंगळेवढ्यातील शेतकरी, करमाळ्यातील केंद्रावर करमाळा व माळशिरस येथील शेतकरी, अनगर केंद्रावर मोहोळ तालुक्यातील शेतकरी
तर मरवडे येथील केंद्रावर मंगळवेढा व सांगोल्यातील शेतकरी शेतमाल हमीभावाने विक्री करु शकतील, अशी माहिती जिल्हा पणन अधिकारी भास्कर वाडीकर यांनी दिली.
शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केल्यानंतर त्यांच्या मोबाईलवर एसएमएस पाठविला जाणार आहे. त्या दिवशी त्यांनी स्वच्छ व वाळलेला चणा विक्रीसाठी हमीभाव केंद्रावर आणावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
सध्या बाजारात हरभऱ्याला प्रति क्विंटल चार हजार 500 रुपयांपर्यंत दर आहे. तरीही यंदा जिल्हाभरातून 70 हजार क्विंटल हरभरा हमीभाव केंद्रावर खरेदी होऊ शकतो, असा अंदाज मार्केटिंग फेडरेशनने वर्तविला आहे.
शेतकऱ्यांसाठी सध्या ऑनलाइन नोंदणी सुरु झाली असून वेळेत त्यांनी नोंदणी करुन घ्यावी. जेणेकरुन त्यांना प्रति क्विंटल 5 हजार 100 रुपयांचा हमीभाव मिळेल, असेही वाडीकर यांनी स्पष्ट केले आहे.
सोलापूर जिल्ह्यात ‘हे’ खरेदी केंद्रे
तालुका खरेदी-विक्री संघ, मंगळवेढा,संत दामाजी शेती व साधन पुरवठा सहकारी संस्था, मंगळवेढा,भाळवणी कृषी फामर्स प्रोड्यूसर कंपनी (मरवडे), संत दामाजी शेती व साधन पुरवठा सहकारी संस्था, मंगळवेढा , विकास सेवा सोसायटी, दुधनी (अक्कलकोट), तुळजाभवानी कृषी व साधन पुरवठा सहकारी संस्था, उंबरगे (बार्शी), कृषी उत्पन्न बाजार समिती, कुर्डूवाडी, विठ्ठल सर्वसाधारण सहकारी संस्था, मांगी (करमाळा) आणि विकास सेवा सहकारी सोसायटी (अनगर) या ठिकाणी हरभरा खरेदी केली जाणार आहे.
मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग संघ याच्यावतीने हमीभाव हरभरा खरेदी केंद्रांच्या ऑनलाईन नावनोंदणीस आजपासून सुरुवात : चेअरमन बबनराव आवताडे
मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग संघ, नाफेड व महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमानाने दि.१८ फेब्रुवारी २०२१ पासुन हमीभाव हरभरा खरेदी केंद्राच्या ऑनलाईन नावनोंदणीची मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग संघाच्या कार्यालयामध्ये सुरवात सकाळी ११ वाजता होणार असल्याची माहिती चेअरमन बबनराव आवताडे यांनी दिली.
या खरेदी केंद्रामुळे मंगळवेढा तालुक्यासह व इतर तालुक्यातील सर्व हरभरा उत्पादक शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांनी मंगळवेढा तालुका सहकारी कृषि उद्योग संघ कार्यालयाच्या विभागाकडून एसएमएस प्राप्त झाल्यानंतर शेतक-यांनी हरभरा विक्रीसाठी हमीभाव केंद्रावर आणायचा आहे.
त्यानंतर विक्री केलेल्या हरभरा या पिकाची रक्कम ऑनलाईन शेतक-यानी दिलेल्या बँक खात्यावर जमा होणार आहे चालुवर्षी हरभरा या धान्यासाठी आधारभूत किंमत ५१०० /- रुपये आहे.
नावनोंदणी साठी सन २०२०-२०२१ च्या हरभरा या पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा आधार कार्ड झेरॉक्स बँक पासबुकची स्पष्ट दिसत असणारे झेरॉक्स व मोबाईल नंबर ची आवश्यकता आहे.
खरेदी केंद्रांच्या अधिक माहिती साठी कृषि उद्योग सहकारी संघाचे व्यवस्थापक हणमंतराव मासाळ ९६६५७४१९६० शंभुमामा नागणे मो नं ९४०५२१४५९५, मच्छिंद्र कोंडुभैरी ९८९०८३१९३४ (९०२८५०९७७७) यांचेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज