टीम मंगळवेढा टाईम्स ।
महाराष्ट्रातील नववी ते बारावीचे वर्ग नोव्हेंबरपासून सुरू झाल्यानंतर आता महाविद्यालयेही लवकरच सुरू करण्याचे सुतोवाच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून केले.
राज्यातील परिस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यामार्फत आढावा घेऊन विद्यापीठे, महाविद्यालये, अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षण संस्था विद्यार्थ्यांच्या 50 टक्के उपस्थितीत सुरू करण्याविषयीचा निर्णय 20 जानेवारीपर्यंत घेण्यात येईल, असे उदय सामंत यांनी सांगितले.
महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी जिल्ह्याधिकारी, विद्यापीठांचे अधिकारी यांच्याशी चर्चा करून तेथील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल.तसेच प्रत्येक जिल्ह्यातील वसतिगृहांची तपासणी, क्वारंटाईन सेंटरसाठी देण्यात आलेल्या महाविद्यालयांची सद्यस्थिती याची पाहण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
महाविद्यालयात येणारे विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्य आणि शिक्षकेतर कर्मचार्यांची सुरक्षा, त्यांचे आरोग्य याला सर्वप्रथम प्राधान्य असल्याचे सांगून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाविद्यालयांसाठी वेगळी नियमावली तयार करण्याचा विचारही सुरू असल्याचे यावेळी उदय सामंत म्हणाले.
यावेळी त्यांनी प्राध्यापक, प्रायार्य भरती, महाविद्यालयांचे प्रश्न, प्रवेशप्रक्रियेतील अडथळे याविषयांवरही संवाद साधला.
मुंबईत पंडित ह्दयनाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यात येणार असून त्यासाठी ज्येष्ठ संगीतकार पंडीत ह्दयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली 12 सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा उदय सामंत यांनी केली.
संगीत महाविद्यालय उभारण्यासंबंधीचे सर्व निर्णय मंगेशकर समिती घेणार असून लवकरच या समितीतील सदस्यांची घोषणा ह्दयनाथ मंगेशकर करतील, असेही सामंत म्हणाले.
प्रत्येक जिल्ह्यात मुक्त विद्यापीठ
राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्याचा राज्य सरकारचा विचार असून गोवा राज्यात मुक्त विद्यापीठाची शाखा सुरू करण्याविषयी मुख्यमंञी प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा सुरू असल्याचेही उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
सध्या पुणे, नागपूर, रत्नागिरी, अमरावती, सोलापूर, नांदेड सह राज्याच्या सीमाभागातही मुक्त विद्यापीठ केंद्र सुरू होणार आहे.
संवादातील महत्वाचे निर्णय
प्राचार्याची 260 तर विद्यापीठातील 49 संवैधानिक पदे भरण्याचा निर्णय; लवकरच अंमलबजावणीदेखील होणार
तांत्रिक अडचणी पाहता विधी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास 11 व 12 जानेवारीपर्यंत वाढीव मुदत.तंञशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रवेशासही 15 जानेवारीपर्यत मुदतवाढ देण्यात आली आहे.
मुक्त विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनाही सातवा वेतन आयोग लागू.गोंडवाना विद्यापीठात अत्याधुनिक डेटा सेंटर उभारण्यास परवानगी.गडचिरोली, चंद्रपूरसारख्या दुर्गम भागात मॉडेल कॉलेज होणार.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज