टीम मंगळवेढा टाईम्स ।
राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना न्यायालयाने २१ मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ईडीने मलिक यांना २३ फेब्रुवारीला मनी लॉन्डरिंग प्रकरणात अटक केली होती. यानंतर न्यायालयाने नवाब मलिक यांना सात मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावलेली. त्यानंतर आज मलिक यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
या सुनावणीनंतर नवाब मलिक यांच्या कुटुंबियांनी पहिली प्रतिक्रिया दिलीय. नवाब मलिक यांचे भाऊ कप्तान मलिक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधलाय.
आज न्यायालयाने नवाब मलिकांना २१ मार्च पर्यंत कोठडी सुनावली आहे. आता आम्ही पार्टीचे नेते आणि कुटुंबातील लोकांसोबत बसून विचारविनिमय करुन पुढे काय करायचे याचा निर्णय घेऊ,” असं कप्तान मलिक यांनी म्हटलं आहे.
तसेच या निर्णयावर, “आता बोलणे घाईचे ठरेल. ज्याप्रमाणे नेत्यांचे आणि वकिलांचे मार्गदर्शन मिळेल त्याप्रमाणे आम्ही पुढे जाऊ, असंही कप्तान मलिक म्हणालेत.
नवाब मलिक यांच्यावर कोणाच्या दबावाखाली कारवाई करण्यात आली का असा प्रश्नही कप्तान मलिक यांना विचारण्यात आला.
त्यावर उत्तर देताना, “ईडीने कोणाच्या दबावाखाली येऊन ही कारवाई केली हे जगजाहीर आहे. जेव्हा नवाब मलिक तुमच्यासमोर (प्रसारमाध्यमांसमोर) येतील तेव्हा ते स्वत: याबाबतीत खुलासा करतील.
नवाब मलिक राष्ट्रवादी पार्टीचे प्रवक्ते आहेत. त्यांनी गेल्या चार महिन्यांत ज्याप्रकारे आपले बोलणे मांडले होते. त्यानंतरच मलिक यांना २३ तारखेला नोटीस न बजावता चौकशीस नेले होते.
हा सारा घटनाक्रम मुंबई नाही महाराष्ट्र नाही तर पुर्ण भारत जाणतो,” असा टोला कप्तान मलिक यांनी थेट भाजपाचं नाव न घेता लगावला आहे. “नवाब मलिक तुमच्यासमोर येतील तेव्हा सविस्तर बोलतीलच, असंही कप्तान मलिक म्हणालेत.
मुंबई हायकोर्टात जामीनासाठी अर्ज करणार का असे विचारले असता कप्तान मलिक यांनी, “आमचे वकील तसेच कुटुंबातील एक सदस्य देखील वकील आहेत. तर पुढे काय करायचं याचा निर्णय ते घेतील,” असं उत्तर दिलं.(स्रोत:लोकसत्ता)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज