टीम मंगळवेढा टाईम्स ।
पक्ष संघटनेत बदल करताना जुन्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मंगळवेढा शहर व तालुका राष्ट्रवादी निवडी जाहीर केल्याने नाराज झालेल्या २० पदाधिकारी यांनी पक्षनेते अजित जगताप व तालुकाध्यक्ष भारत बेदरे यांच्या नेतृत्वाखाली गोविंदबाग गाठत हायकमांड शरद पवार यांच्याकडे जिल्हा नेतृत्वाबद्दल तक्रारीचा पाढा वाचला होता.
तसेच नव्या निवडीला आव्हान दिले होते. दुसऱ्याच दिवशी खा. शरद पवार यांचा सोलापूर दौरा झाला त्यादरम्यान याबाबत गुप्त चर्चा झाली, अखेरीस जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी या नव्या निवडीला स्थगिती दिल्याचे पत्रच दिले.
मंगळवेढा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भारत बेदरे व शहराध्यक्ष मुझ्झमिल काझी यांना विश्वासात न घेता नव्या निवडी जाहीर केल्याचे त्यांना सोशल मीडियावरून समजले.
जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील, राहुल शहा, लतीफ तांबोळी, रामेश्वर मासाळ यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थितीत नव्या पदाधिकारी निवडीची पत्रे रात्री पदाधिकाऱ्यांना देण्यात आली होती.
यामध्ये तालुकाध्यक्ष पदी प्रा.पी.बी. पाटील, तर शहराध्यक्ष पदी चंद्रशेखर कोंडुभैरी यांची नव्याने निवड केली होती.
या नव्या निवडीनंतर जुने पदाधिकारी नाराज झाले होते त्यांनी थेट बारामती गाठून नेते शरद पवार याच्या कडे उमेश पाटील, लतीफ तांबोळी यांच्याबाबत तक्रारी केल्या होत्या.
त्यांनी हे पक्षाचे मालक झाल्याप्रमाणे मनमानीपणे ह्या नव्या निवडी केल्या असून जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांचीही यामध्ये दिशाभूल केल्याचे स्पष्टपणे सांगितले होते.
यावर उमेश पाटील यांनी या निवडीला भगीरथ भालके, राहुल शहा , लतीफ तांबोळी, रामेश्वर मासाळ यांच्या शिफारशी वरून ह्या नवीन निवडी करण्यात आल्या असून माझा या निवडीशी काडीमात्र संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.
त्यामुळे ह्या निवडीमागील खरे राजकारण समोर आले होते. त्यामुळे संतापलेल्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी नवे पदाधिकारी हटाव मोहीम सुरू केली होती.
या नव्या निवडीवरून सुरू झालेले अंतर्गत शीतयुद्ध हे आगामी निवडणुकीत पक्षाला घातक ठरू नये म्हणून यासाठी नव्या निवडीना स्थगिती देऊन जुने पदाधिकारी जैसे थे ठेवले असल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांनी दिले आहे.
यावेळी पक्षनेते अजित जगताप, तालुकाध्यक्ष भारत बेदरे, नगरसेवक प्रवीण खवतोडे , शहराध्यक्ष मुझ्झमित काझी आदी उपस्थित होते .नव्या निवडीना स्थगिती मिळाल्याचे वृत्त समजताच शहरात उत्साही कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला.
शरद पवार यांनी आमच्या निवेदनाची गंभीरपणे दखल घेत विश्वासात न घेता केलेल्या नव्या निवडीला स्थगिती देऊन विश्वास दाखविला आहे.
यापुढे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील, दिपक साळुंके, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे ,भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली पक्ष बळकटीकरनासाठी झटत राहू असे पक्षनेते अजित जगताप व तालुकाध्यक्ष भारत बेदरे यांनी बोलताना सांगितले.(स्रोत:लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज