टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी प्रमुख पक्षांकडून उमेदवार असलेल्या दोन्ही साखर कारखानदारांनी गेल्या अनेक वर्षांपासून सहकारी साखर कारखानदारी स्वत:ची खाजगी मालमत्ता समजत सर्वसामान्य शेतकरी, कामगारांची देणी न देता ती गिळंकृत केली. त्यामुळे आर्थिक पिळवणूक झालेले अनेक शेतकरी, कामगार त्यांना निवडणुकीत आपली जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाहीत, अशी टीका अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांनी केली.
शेतकरी, कामगारांना न्याय देण्यासाठीच आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांनी रांझणी (ता. पंढरपूर) येथील शंभू महादेव मंदिरापासून शनिवारी सायंकाळी शेतकरी, कार्यकर्ते, महिलांची रॅली काढत आपल्या प्रचाराला सुरूवात केली आहे.
यावेळी शैला गोडसे यांनी आपली उमेदवारी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, कामगारांच्या न्याय हक्कासाठी आहे. मागील काळामध्ये सहकारी साखर कारखानदारी स्वत:ची खाजगी मालमत्ता समजून शेतकरी, कामगारांची देणी न देता त्याच पैशांवर निवडणुका जिंकायच्या व शेतकरी, कामगारांची पिळवणूक करायची, ही प्रथा रूढ झाली आहे.
या व्यवस्थेविरोधात आपण अनेकवेळा लढा उभा केला. म्हणूनच आपणास मोठ्या पक्षांनी उमेदवारीपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप शैला गोडसे यांनी या प्रचारसभेत केला.
भविष्यात या कारखानदारांना वठणीवर आणण्यासाठी व साखर कामगार, अडचणीतील शेतकरी, सर्वसामान्य नागरिकांच्या न्याय हक्कासाठी आपण मैदानात असल्याचे शैला गोडसे यांनी जाहीर केले.
पाणीप्रश्न चुकीच्या पद्धतीने हाताळल्याने सुटला नाही
पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाची निवडणूक गेली १२ वर्ष मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावच्या उपसा सिंचन योजनेच्या प्रश्नावर लढविली जात आहे. हा प्रश्न व्यवस्थित शासन दरबारी मांडून सोडविणे शक्य असले तरी विद्यमान लोकप्रतिनिधींनी ते चुकीच्या पद्धतीने मांडून लाभार्थी गावातील शेतकरी, नागरिकांची दिशाभूल केली आहे.
त्यामुळेच हक्काच्या पाण्यापासून नागरिक वंचित आहेत. इतर प्रश्न न सोडविता त्याचे फक्त भांडवल केल्यामुळे लोक हक्काच्या योजनांपासून वंचित असून या योजनांना आपले प्रथम प्राधान्य असल्याचे शैला गोडसे यांनी सांगितले.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज