![]() |
मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
राज्यात असणा-या देवस्थान समितीच्या जमिनीचे हस्तांतरण सुलभरित्या व्हावे, यासाठी महिन्याभरात धोरणात्मक निर्णय घेतला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज केली.
ते जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात रत्नागिरी जिल्हाची आढावा बैठक मुख्यमंत्री श्री . ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी झाली याप्रसंगी बोलत होते.
यावेळी उद्योग व खनिकर्म मंत्री सुभाष देसाई , रत्नागिरीचे पालकमंत्री तथा परिवहन मंत्री अनिल परब सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत,जिल्हा परिषद अध्यक्ष रोहण बने,खासदार विनायक राऊत,आमदार दीपक केसरकर,विधानपरिषद सदस्य आमदार हुस्नबानू खलिफे,आमदार राजन साळवी,आमदार योगेश कदम,आमदार शेखर निकम,मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित होते.
जिल्ह्यातील विविध विषयांबाबत सविस्तर आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले,अनेक विकास प्रकल्पांमध्ये गावठाणची जमीन व लगत असणारी देवस्थानची जमीन यामुळे अडथळा निर्माण होत आहे. देवस्थानची जमीन सहजरित्या हस्तांतरण करण्यासाठी यासाठी धोरणात्मक निर्णय आवश्यक होता.
महसूलचे अप्पर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती.या समितीचा अहवाल पंधरा दिवसात येणे अपेक्षित आहे.त्यामुळे येत्या महिन्याभरात राज्यासाठी धोरणात्मक निर्णय घेतला जाईल. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना एकत्रित घेऊन जिल्ह्याच्या ठिकाणी बैठक घेण्याची प्रथा सुरु केली असून यामुळे सर्व प्रश्न लवकरात लवकर सोडविले जाऊ शकतील.
त्याच त्याच प्रश्नांसाठी मंत्रालयात येण्याची गरज लागणार नाही, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, सर्वसामान्य जनेतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन प्रयत्न करतेय, हे स्थानिक जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे.सोबतच प्रश्नांचा पाठपुरावा केल्याने त्याचा मार्ग निघतो,अशी धारणा या मागे आहे.
वेगवेगळ्या ठिकाणच्या पर्यटन स्थळांचा विकास करण्याचे प्रस्ताव लोकप्रतिनिधीकडून येत आहेत. याचा वेगळा विचार करण्यापेक्षा संपूर्ण जिल्ह्यातील पर्यटन स्थळांसाठी एकत्रित आराखडा तयार केल्यास त्याला गती देणे अधिक सोयीचे होईल.रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जिल्हा घोषित करण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधिंनी पालकमंत्र्यांसमवेत एकत्रित बसून यावर चर्चा करावी यातील फायदे व तोटे याचा आढावा घेऊन अंतिम निर्णय कळविल्यास, अशी घोषणा करण्यास वेळ लागणार नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
———————
मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज