टीम मंगळवेढा टाईम्स ।
ओएलएक्स OLX या ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळावर सेकंडहॅंड वस्तू खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.
ग्राहकांना स्वस्त दराचे आमिष दाखवून मोबाईल, चारचाकी गाड्या व इलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीत लाखो रुपयांची फसवणूक होत आहे.
या प्रकरणी सायबर पोलिसांनी गंभीर दखल घेत ग्राहकांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. ओएलएक्स या ऑनलाइन शॉपिंगच्या संकेतस्थळावर मागील काही महिन्यांत सेकंडहॅंड वस्तू विक्रीचे प्रमाण वाढले आहे.
फसवणूक करणाऱ्या व्यक्ती खोटी नावे वापरून त्यांच्या वस्तूच्या माहितीच्या पोस्ट टाकत आहेत. यामध्ये मोबाईल, फोरव्हीलर गाड्या, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू या वस्तूंची विक्री सेंकडहॅंड असल्याने स्वस्त दरात करण्याचे आमिष ग्राहकांना दाखवले जाते.
राजस्थान व हरियाणा भागातील अनेक व्यक्ती या प्रकारात अधिक सहभागी आहेत. ऑनलाइन पोस्ट पाहून ग्राहकांनी ती खरेदी करण्याची तयारी दर्शवली की त्यांची आर्थिक फसवणूक केली जाते.
तसेच ग्राहकांचा विश्वास बसावा म्हणून या व्यक्ती भारतीय सैन्यदलात अधिकारी व कर्मचारी असल्याचे खोटे सांगतात. तसेच हे संशयित त्यांच्या स्वतःच्या नावाने सिमकार्ड कधीही करत नाहीत. इतर व्यक्तीच्या नावाचे सिमकार्ड वापरून हा प्रकार केला जातो. त्यासाठी परराज्यातील सिमकार्डचा वापर केला जात आहे.
ग्राहकाने सेकंडहॅंड वस्तू खरेदी करण्याची तयारी दर्शवली की हे लोक आधी जादा रकमेची ऍडव्हॉन्स रक्कम ग्राहकांकडून जमा करून घेतात.
तसेच नंतर टॅक्स म्हणून अनेक वेळा रकमा ग्राहकांकडून मागून घेत त्यांची आर्थिक फसवणूक करतात. तसेच दुसऱ्याच्या खात्यावर पैसे भरायला लावतात. सिमकार्ड, बॅंक खाते हे इतरांच्या नावाने असल्याने फसवणुकीचा शोध घेणे ग्राहकाला देखील अशक्य होते.( स्रोत:सकाळ)
ग्राहकांनीआमिषाला बळी न पडता सावधानतेने व्यवहार करावेत
ओएलएक्स ऑनलाइन शॉपिंग संकेतस्थळावर मोठ्या प्रमाणात सेकंडहॅंड वस्तूंच्या खरेदीत ग्राहकांच्या फसवणुकीचे प्रकार होत आहे. त्यासाठी ग्राहकांनी या आमिषाला बळी न पडता सावधानतेने व्यवहार करावेत. – एस. जी. बोठे, पोलिस उपाधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर ग्रामीण
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज