मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते. फडणवीस यांनी मराठा समाजाला टिकणारे आरक्षण दिले होते.
मात्र, महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाकडे पूर्णतः दुर्लक्ष केले. त्यांनीच मराठा आरक्षण जाणूनबुजून गमावल्याचा आरोप राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी केला.
छत्रपती संभाजीनगरमध्ये रविवारी आयोजित आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीनंतर ते माध्यमांशी बोलत होते.
डॉ. सावंत म्हणाले, मागच्या सरकारची मराठा आरक्षणाबाबतची भूमिका संशयास्पद होती. त्यांनी मेहनत न घेतल्यामुळेच आरक्षण टिकवता आले नाही. या सगळ्या गोष्टींमुळे आरक्षण गेल्याची मराठा समाजाची भावना आहे.
आता मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसंदर्भात संवेदनशील आहेत. आरक्षणाबाबत फेरआढावा घेऊन ते मिळवण्यासाठी
प्रयत्नशील असल्याचा आशावाद व्यक्त करत मराठा समाजाला आगामी ६ महिन्यांत टिकाऊ आरक्षण मिळावे, हे आरक्षण कशातून द्यायचे, हे शासनाने आणि न्यायालयाने ठरवावे, असे डॉ.सावंत म्हणाले.
तो डाव हाणून पाडू!
मराठा समाजाकडून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याची मागणी होत आहे. यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर सावंत म्हणाले, मराठा समाज आरक्षणाच्या मूळ मागणीला खीळ बसावी, त्याला फाटे फुटावेत, यासाठी आता मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळायला हवे, अशी मागणी केली जात आहे.
आम्हाला कुणाच्या ताटातले, वाटीतले आरक्षण द्यावे, ही आमची मागणी मुळीच नाही. महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांचा वारसा असलेले राज्य आहे. येथील ओबीसी, एसटी, एससी आणि मराठा समाज हा हातात हात घालून नांदतो. ही महाराष्ट्राची खरी परंपरा आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज