टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा प्रांत कार्यालयात लाच प्रकरण घडल्यानंतर भूसंपादन विभागात त्या तलाठयाच्या जागेवर अदयापही कोणाची नियुक्ती न केल्यामुळे बाधित शेतकर्यांची हेळसांड होत असल्याने तात्काळ येथे कर्मचारी नेमून शेतकर्यांच्या अडी अडचणी मार्गी लावाव्यात अशी मागणी होत आहे.
दरम्यान, लाच प्रकरणानंतर या विभागात काम करण्यास कर्मचारी नाखूश असल्याचे चित्र आहे.
प्रांत कार्यालयात लाच लुचपत विभागाने छापा टाकल्यानंतर भूसंपादन विभागात कार्यरत असलेले आरोपी तथा तलाठी यांना अटक झाल्याने या जागेवर अदयाप कुठलाही कर्मचारी अधिकृतपणे नेमला नसल्यामुळे बाधित शेतकर्यांची कामे थांबल्याच्या तक्रारी सांगोला व मंगळवेढा तालुक्यातील शेतकर्यांच्या आहेत.
सोमवार दि.10 रोजी शासकिय कामकाजाचा पहिला दिवस असल्याने सांगोल्याहून अनेक बाधित शेतकरी प्रांत कार्यालयात आले होते. त्यांनी भूसंपादन विभागात संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र हा विभाग कुलूपबंद असल्याने दिवसभर तिष्ठत थांबून आल्या पावलाने त्यांना माघारी जावे लागल्याने त्या बाधित शेतकर्यांनी प्रशासनाच्या कामकाजाबाबत संताप व्यक्त केला.
येथील वरिष्ठ अधिकारी लाच प्रकरण घडल्यापासून फिरकले नसल्याची खमंग चर्चा कार्यालयात परिसरात शेतकरी व नागरिक वर्गातून सोमवारी दिवसभर सुरु होती.
प्रसार माध्यमांनी याबाबत वस्तूतिथीदर्शक माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता वरिष्ठ अधिकारी सोलापूर येथे मिटींगला गेल्याचे येथील कार्यालयातील कर्मचार्यांनी सांगितले.
भूसंपादन विभागातील त्या कामकाजाबाबत विचारले असता काम चालू असल्याचे नायब तहसीलदार प्रकाश सलगर यांनी सांगितले.
दरम्यान शेतकरी मात्र भूसंपादन विभागास कुलूप लावल्याचा दावा करीत आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी प्रत्यक्ष माहिती घेवून याबाबत शहनिशा करून शेतकर्यांची गैरसोय होणार नाही यासाठी तेथे अन्य कर्मचारी नेमून कामकाजात सुरळीतपणा आणावा अशी मागणी होत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज