टीम मंगळवेढा टाईम्स ।
महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपने राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीत 155 ते 160 जागा लढवण्याचा निर्धार केल्याची माहिती समोर आली आहे.
कोणत्याही परिस्थितीत विधानसभेच्या 155 पेक्षा कमी जागा लढवायच्या नाहीत, अशी भूमिका राज्यातील भाजप नेत्यांनी घेतल्याचे समजते.
त्यामुळे महायुतीमधील शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला अवघ्या 128 ते 133 जागाच येण्याची शक्यता आहे. महायुतीमधील उर्वरित घटकपक्षांसाठी जागा सोडाव्या लागतील.
त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिंदे गट आणि अजितदादा गटाचे 80 ते 100 जागा लढवण्याचे स्वप्न अधुरेच राहण्याची शक्यता आहे. ‘दैनिक लोकमत’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.
पुण्यात सोमवारी भाजपचे महासंमेलन पार पडणार आहे. या महासंमेलनासाठी भाजपचे केंद्रीय नेते अमित शाह हे शनिवारी रात्रीच पुण्यात दाखल झाले होते.
भाजपकडून सोमवारी विधानसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले जाईल. तत्पूर्वी आज पुण्यात भाजप प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन पार पडेल. या अधिवेशनाला अमित शाह उपस्थित राहणार आहेत. यावेळी ते भाजप कार्यकर्त्यांना काय संदेश देणार, हे पाहावे लागेल.
गुरुवारी आणि शुक्रवारी भाजप बैठकीमध्ये राज्यातील विधानसभेच्या जागांविषयी आढावा घेण्यात आला होता. त्यानंतर आज अमित शाह यांच्या उपस्थितीत पुण्यात बालेवाडी येथील श्री शिव छत्रपती क्रीडा संकुल येथे प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन होईल.
सकाळी 11 पासून अधिवेशनाला सुरवात होईल. लोकसभेत राज्यात भाजपाला मिळेलेल्या कमी जागा यावर अमित शहा यांच्याकडून पदाधिकाऱ्यांची कशी कानउघडणी होणार का, याबाबत उत्सुकता असणार आहे.
मुख्यमंत्रीपदाबाबत भाजपची स्ट्रॅटेजी?
महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणायची, हे भाजपचे स्वप्न आहे. मात्र, त्यासाठी 288 जागा स्वतंत्रपणे लढायची वेळ आता निघून गेली आहे. त्यामुळे महायुतीमध्ये जे आमदार ज्या पक्षातून निवडून आले आहेत,
त्यांच्या जागा कायम ठेवून उर्वरित जागांबाबत बोलणी करण्याचे धोरण भाजपने स्वीकारल्याची माहिती आहे. तसेच विधानसभा निवडणुकीसाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर न करता सामूहिक नेतृत्त्वाखाली लढायचे, अशी भाजपची रणनीती आहे.
ज्या राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे किंवा ज्याठिकाणी भाजपने अन्य पक्षांसोबत युती करुन सरकार स्थापन केले आहे, अशा राज्यांमध्ये भाजपने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा न जाहीर करण्याचे धोरण राबवले आहे.
निवडणूक झाल्यानंतर मोदी-शाह धक्कातंत्राचा वापर करुन कोणालाही अपेक्षित नसलेल्या नेत्याची मुख्यमंत्रीपदी निवड करतात, हा पॅटर्न अलीकडे काही राज्यांमध्ये दिसून आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही भाजप याच धोरणाचा वापर करेल, असे सांगितले जात आहे.(स्रोत:ABP माझा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज