टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघाचे दिगवंत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार येणार अन् मतदारसंघाचा उमेदवार घोषित करणार, अशी आशा पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना होती.
परंतु गर्दीतून भगीरथ भालकेंच्या नावाची घोषणा होऊ लागताच शरद पवार यांनी भाषणात,आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे असे सांगितले.
दिवंगत आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी शरद पवार आज पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे आले.भालके कुटुंबीयांच्या भेटीनंतर त्यांनी जमलेल्या लोकांसमोर मनोगत व्यक्त केले.
पवार बोलत असताना पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील उमेदवार घोषित करावा अशी मागणी भालकेंच्या कार्यकर्त्यांनी केली. यावेळी भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके यांच्या नावाची घोषणा पवार करतील असे कार्यकर्त्यांना वाटले होते.
मात्र पवार यांनी सांगितले की,आपल्याला एकत्र बसून या विषयावर चर्चा करायची आहे. तत्काळ त्यावर बोलता येणार नाही. त्याचबरोबर आपल्याला सर्वांना बरोबर घेऊन जायचे आहे.
विशेष म्हणजे या शब्दावरच पवार यांनी अधिक जोर दिला. त्यामुळे पंढरपूर मतदार संघातील उमेदवार कोण असणार याचे पत्ते शेवटपर्यंत ओपन झालेच नाहीत.
दरम्यान, विठ्ठलचे उपाध्यक्ष लक्ष्मण पवार यांनी मला कारखान्याची माहिती सांगितली असून इथली स्थिती काळजी करण्यासारखी आहे, असे म्हणत पवारांनी पहिल्यांदा विठ्ठल कारखान्याची घडी बसवणार असल्याचेही स्पष्ट केले.(लोकमत)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
![ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा](https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2021/12/WhatsApp-Add.gif)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज