टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपुरात दर्शन रांगेत हजारो भाविक काल मंदिरात दिवसभर व्हीआयपीकडून झटपट दर्शनासाठी गर्दी केल्याने दर्शन रांगेतील गोरगरीब भाविकांना 14 तासापेक्षा जास्त वेळ लागला होता.
यातच रात्री पावसाने जोरदार बॅटिंग केल्याने भाविकांचे मोठे हाल झाले होते. मंदिर प्रशासन खडबडून जागे झाले. आजपासून कोणत्याही व्हीआयपी भाविकांना देवाच्या झटपट दर्शनासाठी न सोडल्याने काळ तासंतास एकाचजागी थांबलेली दर्शन रांग आज जोराने धावू लागली आणि केवळ 4 ते 5 तासात भाविकांना देवाचे दर्शन होऊ लागले.
विठ्ठल दर्शनासाठी आषाढी काळातील 10 दिवस संपूर्ण व्हीआयपी दर्शन बंद करण्याची मागणी काल लावून धरली होती . काळ दिवसभर रांगेत ताटकळत थांबलेल्या भाविकांना रात्री पावसाने झोडपून काढले.
दर्शन रांगेतील पत्रे गळू लागल्याने भाविक रात्रभर चिंब भिजून दर्शन रांगेत अडकून पडला होता . काल भाविकांनी थेट मुख्यमंत्र्यांना आवाहन करीत आषाढी काळात येणाऱ्या भाविकांना आमच्या प्रमाणे दर्शन रांगेतून दर्शन घेऊ द्या अशी मागणी केली होती.
यानंतर वरिष्ठ पातळीवरून सूत्रे हलली आणि अखेर आज सकाळीपासून मंदिर प्रशासनाने कोणत्याही व्हीआयपी भाविकाला घुसखोरी करून झटपट दर्शन करू दिले नाही .
यामुळे काल गोपाळपूर पत्रा शेडमध्ये 8 ते 10 तास अडकलेली रांग आज सकाळीपासून पळू लागली आणि दर्शन रांगेतील भाविकांना केवळ 4 ते 5 तासात दर्शन मिळू लागले.
व्हीआयपीच्या घुसखोरीला पूर्णपणे पायबंद
याचा परिणाम भाविकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान येऊ लागले आणि सर्वसामान्य भाविक विठुरायाचे अभंग गात आपला आनंद व्यक्त करू लागले. माझाने भाविकांचे हाल दाखविल्याने अखेर मंदिर प्रशासनाला जाग आली आणि आजपासून व्हीआयपीच्या घुसखोरीला पूर्णपणे पायबंद केला आहे.
आषाढी जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतशी दर्शन रांगेतील भाविकांची संख्या देखील वाढत चालली आहे . आषाढी काळात कोणीही व्हीआयपी मंडळींनी झटपट दर्शनासाठी आग्रह धरू नये असे आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी माझाच्या माध्यमातून केले आहे.
दर्शन रांगेत हजारो भाविक थांबले असताना घुसखोरी करून झटपट दर्शनासाठी आलेल्या या बंदी मंडळी आणि व्हीआयपी मुले सर्वसामान्य भाविकांना दर्शन रांगेत तासंतास ताटकळत थांबावे लागत असल्याने झटपट दर्शन बंदी कठोरपणे राबविणार असल्याचे शेळके यांनी सांगितले .
केवळ चार ते पाच तासात देवाचे दर्शन
एकंदर आज देखील काल एवढीच गर्दी असताना काल जिथे 14 ते 15 तास दर्शनाला लागत होते आज केवळ चार ते पाच तासात देवाचे दर्शन घडत होते . आता खरंच मुख्यमंत्र्यांनी आमदार , खासदार , वरिष्ठ अधिकारी याना आषाढी काळात चिट्ठ्या , पत्रे देण्यास आणि फोन करून दबाव आणण्यापासून रोखल्यास पुढील कालावधीत देखील व्हीआयपी दर्शन बंदीच्या निर्णयाची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होऊ शकणार आहे .
हे खरे व्हीआयपी यांची संख्या खूप मर्यादित असली तरी त्यांच्या नावाखाली रोज हजारोच्या संख्येने वाममार्गाने घुसखोरी करण्यास मदत करणाऱ्या मंदिरातील काही एजंट आणि घटकांना पायबंद बसू शकणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज