कार्तिकी दशमी आणि एकादशी (बुधवार व गुरुवार) पंढरपूर शहरात वारकऱ्यांना प्रवेश नसला तरी बंदोबस्तासाठी शेकडोंच्या संख्येने पोलिस दाखल झाले आहेत.
कार्तिकी एकादशी दिवशी गुरुवारी (ता. 26) पहाटे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्निक श्री विठ्ठल – रुक्मिणीची शासकीय महापूजा होणार आहे.
शासनाने राज्यातील मंदिरे भाविकांसाठी खुली केल्यानंतर गेल्या सुमारे आठ महिन्यांपासून प्रवेश बंद असलेल्या येथील श्री विठ्ठल – रुक्मिणी मंदिरात भाविकांना मुखदर्शनासाठी सोडण्यात येऊ लागले होते.
परंतु कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी ऐन कार्तिकी यात्रेत पंढरपूर शहर आणि लगतच्या अकरा खेडेगावांमध्ये 25 आणि 26 नोव्हेंबर असे दोन दिवस संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
त्यामुळे 25, 26 आणि 27 या तीन दिवसांत मुखदर्शन देखील बंद राहणार आहे.यात्रेसाठी वारकऱ्यांना पंढरपुरात येण्यास मज्जाव करण्यात आला असला तरी बंदोबस्तासाठी सुमारे 1700 पोलिस कर्मचारी दाखल झाले आहेत.
दोन दिवस जिल्हा पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. जिल्हा, तालुका आणि शहराच्या हद्दीवर नाकाबंदी पाईंट कार्यरत करण्यात आले आहेत.
दरम्यान, गुरुवारी (ता. 26) पहाटे एक वाजता श्री विठ्ठल – रुक्मिणीची नित्यपूजा मंदिर समितीच्या सदस्यांच्या हस्ते केली जाईल. त्यानंतर दोन वाजून वीस मिनिटे ते तीन या वेळात श्री विठ्ठलाची तर तीन ते साडेतीन या वेळात श्री रुक्मिणी मातेची महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्निक होईल.
त्यानंतर श्री. पवार यांच्या हस्ते मानाच्या वारकऱ्याचा आणि मंदिर समितीच्या वतीने श्री. पवार यांचा सत्कार होईल.आषाढी यात्रेच्या वेळी एकादशीला भक्तांना प्रवेश नव्हता, त्यामुळे मंदिर समितीच्या सहा विणेकऱ्यांमधून चिठ्ठी टाकून एकाची मानाचा वारकरी म्हणून निवड करण्यात आली होती.
त्याचप्रमाणे यंदा कार्तिकी एकादशी दिवशी मंदिरातील विणेकऱ्यांच्या चिठ्ठ्या टाकून त्यांच्यापैकी एकाला श्री विठ्ठल – रुक्मिणीच्या शासकीय महापूजेच्या वेळी उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहण्याचा मान दिला जाणार आहे, अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील तथा विठ्ठल जोशी यांनी दिली.
25 ते 27 नोव्हेंबर असे तीन दिवस भाविकांना मुखदर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. परंतु 28 तारखेपासून ऑनलाइन दर्शनाचे बुकिंग करून आलेल्या भाविकांना मंदिरात मुखदर्शनासाठी सोडले जाणार आहे.
लॉज चालकांना नोटिसा
25 आणि 26 असे दोन दिवस शहरात संचारबंदी असली तरी शहरातील मठांमधून आणि लॉजमधून आधी कोणी येऊन राहू नये यासाठी मठ आणि लॉज मालकांना मठ आणि लॉजमधून कोणालाही राहण्यास देऊ नये, अन्यथा कारवाई केली जाईल, अशा आशयाच्या नोटिसा पोलिसांनी बजावल्या आहेत.
त्यामुळे यात्रा काळात ज्या लॉजमधून नेहमीपेक्षा दुपटीने, तिपटीने दर आकरणी करून रूम भाड्याने दिल्या जात असत, त्या रूम सध्या कुलूप लावून बंद ठेवण्याची वेळ लॉज मालकांवर आली आहे.
दि.25 आणि 26 रोजी एसटी वाहतूक सुरू राहणार असली तरी केवळ पंढरपूरच्या स्थानिक नागरिकांनाच ओळखपत्र पाहून पंढरपूर शहरातील त्यांच्या घरी अथवा कामावर जाण्यास परवानगी दिली जाणार आहे.(source:सकाळ)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज