मंगळवेढा टाइम्स न्युज नेटवर्क।
राज्यभरात मुसळधार पावसानं धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर काही ठिकाणी वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. काल राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर पावसाचा जोर वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तसेच धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याचे दिसत आहे. जाणून घेऊयात राज्याच्या कोणकोणत्या भागात पावसानं हजेरी लावली आहे.
मुंबईसह नवी मुंबई ठाण्यात मुसळधार पाऊस
सकाळपासूनच मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस सुरु आहे. सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. त्यामुळं वाहतुकीवर परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तसेच लोकल रेल्वे सेवेवर देखील परिणाम झाला आहे.
त्याचबरोबर ठाणे परिसारात देखील मुसळधार पाऊस सुरु आहे. दरम्यान, या मुसळधार पावसाच्या पार्श्नभूमीवर नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नवी मुंबईतही मुसळधा पाऊस सुरु आहे.
सोलापुरात जोरदार पाऊस, उजनीच्या पाणी पातळीत मोठी वाढ
राज्यात पावसानं (Rain) धुमाकूळ घातला आहे. राज्याच्या विविध भागात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आल्याचं चित्र दिसत आहे.
दरम्यान, गेल्या तीन ते चार दिवसापासून सोलापूर जिल्ह्यात देखील जोरदार पाऊस सुरु आहे. यामुळं नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी म्हणजे राज्यातील सर्वात मोठ्या धरणांपैकी एक असलेल्या उजनी धरणाच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. धरण सध्या वजा पातळीत आहे,
मात्र लवकरच ते अधिक पातळीत जाणार आहे. उजनी धरण झपाट्याने वजा पातळीतून अधिक पातळीकडे जाऊ लागले आहे. धरणात सध्या 18000 क्युसिक वीसर्गाने पाणी जमा होत असून आजची टक्केवारी वजा 7.72 एवढी आहे. त्यामुळं जर असाच पाऊस सुरु राहिला तर पुढच्या दोन दिवसात धरण अधिक पातळीत येण्याची शक्यता आहे.
पुण्यासह दौंड इंदापूर, बारामती तालुक्यात मुसळदार पाऊस
काल रात्रीपासून विश्रांती घेतलेल्या पावसानं पुणे शहरात पुन्हा हजेरी लावली आहे. पुणे शहरासाठी आज पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. शहरातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे,
मुसळधार पावसामुळे संपूर्ण भिगवण परिसर जलमय झाला आहे. विशेषतः पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या सर्विस रोडला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. हा संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला आहे. भिगवण बस स्थानकात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भिगवणच्या थोरात नगर भागात रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहताना दिसत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून, नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही घरांमध्ये पाणी देखील शिरलं आहे.
दरम्यान दुसरीकडे दौंडला देखील पावसानं झोडपलं आहे. दौंडमधील स्वामी चिंचोली गावाला पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. मुसळधार पावसामुळे गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यावरून पाणी वाहत असल्याने गावचा संपर्क तुटला आहे.
अनेक घरे पाण्याखाली बुडाली आहेत. बारामती तालुक्यातून वाहणाऱ्या निरा डावा कालव्याला पिंपळी लिमटेक या ठिकाणी भगदाड पडलं आहे. या कालव्याचे सर्व पाणी नागरिकांच्या शेतात आणि घरामध्ये शिरले असून, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं आहे.
आज दिवसभर पुणे शहरासह घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढील 3 ते 4 तासांत जिल्ह्यांतील काही ठिकाणी 50 ते 60 किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागरिकांनी सतर्क राहावे, अशा सूचना प्रशासनाच्या वतीनं देण्यात आल्या आहेत.
नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस, शेती पिकांना फटका
नाशिकमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झाले असून बळीराजा पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे. तर दुसरीकडे शेतकर्यांच्या नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे देखील अद्याप झाले नसल्याने शेतकरी नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी करत आहे. नाशिक तालुक्यात शेतकऱ्यांच्या उभ्या कांदा पिकात पाणी साचल्याने संपूर्ण कांदा शेतात सडल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर जास्त पावसाने शेडमध्ये असलेली शिमला मिरची पिक खराब होऊन शेतकर्याचा हाता तोंडाशी आलेला घास हिरवल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
तर दुसरीकडे नाशिक जिल्ह्याच्या सिन्नरमध्ये झालेल्या पावसात बाजार समितीमधील खळ्यात पावसाचे पाणी सचल्यानं कांदा गोण्यासह भिजला आहे. तर काही प्रमाणात कांदा अक्षरक्ष: वाहून गेला आहे. शेतीत भाजीपाला आणि बाजार समिती मधील कांदाचे मोठं नुकसान झाल्याने बळीराजाचे स्वप्न भंगल्याची भावना शेतकरी वर्गातून व्यक्त केली जातेय.
पावसाचा फटका राजगड जिल्ह्याला बसला असून नदी, नाले आणि सखोल भागात पाणीच पाणी झाले आहे. तर आजपासून पुढील 7 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून (IMD) देण्यात आला आहे. दरम्यान, हिंदवी स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगड (Raigad Fort) महामार्गावरील कोंझर घाटात असलेल्या धबधब्यातील येणाऱ्या मुसळधार पाण्याने नव्यानं बांधण्यात आलेल्या मोरीच्या परिसरातील बायपास मार्ग खचला आहे.
परिणामी या मार्गावरील वाहतूक पोलीस प्रशासनाकडून बंद करण्यात आली आहे. किल्ले रायगड परिसरात देखील ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने वर्तविलेलया अंदाजानुसार आज रायगडमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाची रिपरिप सुरू आहे. रायगडच्या श्रीवर्धन तालुक्याला पावसाने अक्षरक्ष: झोडपले आहे. या जोरदार पावसामुळे श्रीवर्धन तालुक्यातील वाळवटी गावात पाणीच पाणी झाले आहे. श्रीवर्धनमध्ये तब्बल 136 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून ही नोंद आतापर्यंत सर्वाधिक असल्याची माहिती समोर आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार कायम आहे. जिल्ह्यातील सहाही बंधारे पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. पंचगंगा नदीची पाणीपातळी 17 फूट 5 इंच इतकी झाली आहे.
गेल्या 48 तासात पंचगंगा नदीची पाणीपातळी केवळ पाच इंचांनी वाढली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज