टीम मंगळवेढा टाईम्स ।
ग्रामपंचायत निवडणुकीची रंगत आता वाढली आहे. उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता अर्ज माघारीसाठी खेळ्या खेळल्या जात आहेत. आज दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे.निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काही ठिकाणी हालचाली सुरू आहेत, तर काही ठिकाणी बंडोबांना थोपविण्यासाठी गळ घातली जात आहे.
माघार घेण्यासाठी संबंधितांशी गोड बोलून माघार घेण्यासाठी शब्द दिला जाईल; पण तो शब्द भविष्यात पाळला जाईलच, याची खात्री कोण देणार, असा प्रश्न संबंधित उमेदवारांना पडला आहे.
या निवडणुकीत अनेक आघाड्या होण्याची शक्यता असून पॅनेलप्रमुखांची कसोटी लागणार आहे.
मंगळवेढा तालुक्यातील 23 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापला आहे.उमेदवारी अर्ज मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. आता माघार कोण कोण घेणार याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. काही ठिकाणी बंडखोरी झाली असून अनेकांचे गणित बिघडले आहे.
बंडखोरी करणाऱ्यांवर अर्ज माघारीसाठी दबाव टाकला जात आहे. काही तरी आमिष दाखवून निवडणूक लढविण्यापासून परावृत्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपेपर्यंत गोड गोड बोलून वातावरण निर्मिती केला जाणार आहे.
इच्छुकांच्या अपेक्षा धुळीस
निवडणूक निकालानंतर सरपंचपदांसाठी आरक्षण सोडत घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. गावचे सरपंचपद सन्मानाचे मानले जाते. ही खुर्ची आपल्यालाच मिळावी म्हणून अनेक इच्छुक देव पाण्यात घालून बसले होते; परंतु या निर्णयाने त्यांच्या अपेक्षा धुळीला मिळाल्या आहेत.
सरपंचपदाच्या आरक्षणाचा पेच
गावागावात निवडणुकीसाठी आघाड्या करण्याच्या किंवा बिनविरोध निवडणूक करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. सरपंचपदाच्या आरक्षणाची खात्री देता येत नाही.
खुल्या प्रवर्गातील सरपंचपदासाठी कोणत्याही प्रवर्गातील व्यक्ती चालते; परंतु पद आरक्षित असल्यास त्याच प्रवर्गातील सदस्य आवश्यक आहे. त्यामुळे आपल्यालाच सरपंचपद मिळावे म्हणून प्रत्येक गटात आरक्षित जागा अधिकाअधिक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज