टीम मंगळवेढा टाईम्स ।
याअगोदर पंढरपूर-मंगळवेढ्याला एक आमदार होता. मात्र आता आमदार प्रशांत परिचारकांसोबत मी स्वत: आमदार झालो आहे. त्यामुळे आम्ही दोघं मिळून पंढरपूर-मंगळवेढ्याचा सर्वांगीण विकास करू. मंगळवेढ्याच्या ३५ गावांच्या पाण्यासाठी केंद्रातून निधी आणण्यासाठी प्रयत्न करत असताना इतर समस्याही सोडविण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही नूतन आमदार समाधान आवताडे यांनी दिली आहे.
मंगळवेढा-पंढरपूर पोटनिवडणुकीत विजयाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आ.आवताडे पुढे बोलताना म्हणाले की , या निवडणुकीत आम्हाला विजय अपेक्षित होता. मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी साम, दाम, दंड, भेद या नीतीचा वापर केल्यामुळे अपेक्षित मताधिक्य आम्हाला मिळाले नसले तरी जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे.
या निवडणुकीत आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, खासदार जयसिध्देश्वर महास्वामी आ.गोपीचंद पडळकर,उमेश परिचारक मार्गदर्शन लाभले.
पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जनतेने कोणत्याही भूलथापांना बळी न पडता भाजपच्या उमेदवारास मतदान केले
आ.प्रशांत परिचारक म्हणाले की,सध्याच्या निवडणुकीत विकासाचा मुद्दा बाजूला ठेवत मृत्यूचे राजकारण करत भावनिक मुद्द्यावर मतं मागण्याचा प्रयत्न करण्यात आला. मागील तीन निवडणुकांप्रमाणे या निवडणुकीतही लोकांच्या अस्मितेचा मुद्दा असलेल्या ३५ गावांच्या पाणीप्रश्नासंदर्भात खोटी कागदपत्रं घेऊन राज्याचे अख्खे आघाडी सरकार मैदानात उतरले होते.
मात्र यावेळी पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जनतेने कोणत्याही भूलथापांना बळी न पडता भाजपच्या उमेदवारास मतदान केले आहे. हा विजय परिचारक-आवताडे परिवाराच्या एकतेचा विजय आहे.
पांडुरंग परिवारातील परिचारक प्रेमींनी स्व. सुधाकरपंतांना श्रद्धांजली वाहायची या हेतूने तन, मन, धन एकत्र करत रात्रंदिवस केलेल्या कष्टाचा हा विजय असून, भविष्यात महत्त्वाचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही खांद्याला खांदा लावून काम करू.
खासदार रणजिततिंह नाईक निंबाळकर यांनी म्हटलं की, पंढरपूर तो अभी झांकी है अभी महाराष्ट्र बाकी है, पंढरपूरचा कार्यक्रम झाला आहे. आता राज्यात सत्तांतर होईल.
मागील १५ दिवसांपासून महाविकास आघाडीतील सर्व पक्ष एकत्र आहेत. शिवाय स्व. भारत भालके यांच्या निधनानंतर सहानुभूतीच्या लाटेवर ही जागा आम्ही मोठ्या मताधिक्क्याने निवडून आणू, अशा आत्मविश्वासात असणारे महाविकास आघाडीतील पदाधिकारी पराभव झाल्यानंतर प्रतिक्रिया देण्यासाठी एकही नेता पुढे येताना दिसत नव्हता. उमेदवार भगीरथ भालके यांच्याशिवाय निवडणुकीची सूत्रे सांभाळणारे आ. संजय शिंदे व इतर पदाधिकाऱ्यांशी संपर्क केला असता ते नॉट रिचेबल असल्याचे चित्र दिसून आले.
पहिल्यांदाच पंढरपुरात कमळ फुलले आहे. मतदारसंघाच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच भाजपचा विजय झाला आहे. पंढरपूर पोट-निवडणुकीत भाजप उमेदवार समाधान आवताडे यांचा 3733 मतांनी विजय झाला आहे. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे पंढरपुरात तळ ठोकून होते. तसेच शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील, उदय सामंत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचार करूनही महाविकास आघाडीला भाजपने धूळ चारली आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“भाजपवर जनतेनं विश्वास दाखवला. त्यामुळे मी पंढरपूरच्या जनतेचं मनापासून आभार मानतो. गेल्या दीड वर्षातील महाविकास आघाडीच्या गैरप्रकाराला, भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला एकप्रकारे आरसा दाखवण्याचं काम पंढरपुरच्या जनतेना केलाय. हे सरकार आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे.
या निवडणुकीत राज्य सरकारचे तीन पक्ष उतरले. साम-दाम-दंड-भेद अशा सगळ्या पद्धती अवलंबले. त्यांनी प्रशासनाचा गैर उपयोग केला. मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरउपयोग केला. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
“आमचे उमेदवार समाधान आवताडे यांचं अभिनंदन करतो. जमिनीशी जुळलेले व्यक्तीमहत्व म्हणून ते गेल्या कित्येक वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्यासोबत प्रशांत पारिचारक आणि उमेश पारिचारक हे देखील राम-लक्ष्मणाप्रमाणे त्यांच्यासोबत उभे राहिलेत. रणनिती आखून ही निवडणूक लढवली गेली”, असं फडणवीस म्हणाले.
‘पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला’
“आम्हाला पंढरपुरात पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला. आमच्या टीमने खूप चांगलं काम केलं. भाजप एकत्रित काम करत होती. जनतेपर्यंत पोहोचून आम्ही जनतेची मत मिळवू शकलो. या सरकारने कोरोना काळात कोणाला मदत केली नाही. बारा बलुतेदारात नाराजी होती, वीज तोडली गेली त्यावरुन जनता नाराज होती. त्यामुळे त्यांनी आम्हाला निवडलं”, असं मत त्यांनी मांडलं.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज