टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभेचे आमदार समाधान आवताडे यांच्या ताब्यात असलेल्या संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे.
मंगळवारी तालुक्यातील 108 मतदान केंद्रावर 28 हजार 695 पैकी 24 हजार 521 मतदारांनी हक्क बजावत चुरशीने मतदान केले.
आवताडे यांचे सर्व विरोधक एकत्र आल्याने या निवडणुकीत त्यांना धक्का बसणार की पुन्हा सत्ता काबीज करणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.
मतमोजणी उद्या 14 जुलै रोजी होणार असून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात निकालाची उत्सुकता आहे.
गटनिहाय मतदान
मंगळवेढा गटात 4 हजार 637 पैकी 3हजार 896, आंधळगाव गटात 5 हजार 520 पैकी 4 हजार 726, ब्रह्मपुरी गटात 6 हजार 142 पैकी 5 हजार 129 मरवडे गटात 6 हजार 200 पैकी 5 हजार 365, भोसे गटात 6 हजार 36 पैकी 5 हजार 251 व संस्था मतदार संघातून 160 पैकी 154 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीत कारखान्याचे अध्यक्ष आमदार आवताडे यांच्या गटाविरोधात तालुक्यातील सर्व नेते समविचारी गटाच्या रूपाने एकत्रित आले आहेत.
कामगारांनीही ऐनवेळी आंदोलनाचे हत्यार उपसून सत्ताधारी गटाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र ऐनवेळी चुलते बबनराव आवताडे यांनी पुतण्याच्या पाठीवर हात ठेवल्यामुळे सत्ताधारी गट मजबूत झाला. सत्ताधारी गटातून इतर मागासवर्गीय प्रवर्गातील अशोक केदार हे यापूर्वीच बिनविरोध निवडले गेले आहेत.
संस्था मतदारसंघात खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांच्या विरोधात जगन्नाथ रेवे यांचा उमेदवारी अर्ज सत्ताधारी गटाकडून होता.
मात्र प्रचाराच्या अंतिम दिवशी सिद्धेश्वर आवताडे हे सत्ताधारी गटाच्या व्यासपीठावर आल्यामुळे या मतदारसंघातून विजयी होणारी जागा ही देखील सत्ताधारी गटाची होऊ शकते.
आमचा विजय निश्चित
सभासदांचा आमच्या सहा वर्षाच्या कारभारावर विश्वास असून त्यामुळे आमचा विजय निश्चित आहे.सभासदांनी दिलेला कौल आम्हाला मान्य असेल. – आ. समाधान आवताडे, अध्यक्ष दामाजी शुगर
सत्ताधारी गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय
सुरुवातीच्या काळात समविचारी असलेल्या आघाडी नंतरच्या काळात अविचारी होत गेल्यामुळे कौटुंबिक विषय बाजूला ठेवून आम्ही सत्ताधारी गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला.- सिद्धेश्वर अवताडे, अपक्ष उमेदवार सहकारी संस्था.
विजय 2 हजार पेक्षा अधिक मताने होणार
संस्था वाचवण्यासाठी ही निवडणूक सभासदाने हातात घेतली. सभासद व कार्यकर्त्यांनी केलेल्या एकजुटीमुळे आमच्या गटाचा विजय 2000 पेक्षा अधिक मताने होणार आहे. – शिवानंद पाटील, समविचारी आघाडी
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज