मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-
उद्धव ठाकरे सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात तब्बल ३४ लाख शेतकऱ्यांना सुमारे २९ हजार ७१२ कोटींच्या कर्जमाफीचा लाभ दिला जाणार आहे. पात्र शेतकऱ्यांची यादी १५ फेब्रुवारीला जाहीर होणार असून, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कर्जमाफीची रक्कम संबंधितांच्या खात्यात जमा होणार असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले.
विशेष म्हणजे, फडणवीस सरकारने कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी तब्बल तीन वर्षे घेतली होती. मात्र, ठाकरे सरकार येत्या मे महिन्याअखेर पात्र प्रत्येक शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा करण्याच्या प्रयत्नात आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली.
फडणवीस सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेत शेतकऱ्यांकडून २८ रकान्यांचा अर्ज भरून घेण्यात आला होता. या वेळी मात्र तसे न करता योजनेची अंमलबजावणी सुटसुटीत कशी राहील, याकडे राज्य सरकारचा विशेष कटाक्ष आहे. जिल्हा बँकांकडील थकबाकीदार पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांची छाननी शासनाच्या सहकार विभागामार्फत शासकीय ऑडिटर्सकडून करण्यात येत आहे. तर व्यापारी बँकांकडील कर्जखात्यांची तपासणी कोअर बँकिंग यंत्रणेद्वारे करण्यात येणार आहे. त्यानंतरही योजनेअंतर्गत एखाद्या अपात्र व्यक्तीला कर्जमाफीचे लाभ दिले गेल्याचे आढळून आल्यास त्याला संबंधित बँकेला जबाबदार धरले जाणार आहे.
पहिल्या टप्प्यात जिल्हा बँका आणि व्यापारी बँकांकडील ३४ लाख पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात येत आहे. संबंधित शेतकऱ्यांना २९,७१२ कोटी रुपयांची कर्जमाफी दिली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. येत्या १५ फेब्रुवारीला पात्र शेतकऱ्यांच्या याद्या गावपातळीवर प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज