टीम मंगळवेढा टाईम्स ।
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण वाढविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत कोकरे यांच्यासह चौघांना न्यायाधीशांनी 22 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गैरप्रकार अनेकदा समोर आले आहेत. नापास विद्यार्थ्यांना चांगल्या गुणाने उत्तीर्ण करणे, कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना गुण वाढवून देणे, परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याला गैरहजर दाखविणे असे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत.
पण 25 डिसेंबर 2019 रोजी विद्यापीठाने अनेक विद्यार्थ्यांचे गैरप्रकार करून गुण वाढविण्याची तक्रार पोलिसांत दिली होती.यात धक्कादायक बाब म्हणजे कुलगुरू परदेशी गेल्यानंतर त्यांचा लॉगीन आयडी व पासवर्ड वापरून नापास विद्यार्थ्यांचे गुण वाढविल्याचे समोर आले.
त्यावेळी विद्यापीठाने एक समिती स्थापन करून प्राथमिक तपास केला होता. त्यानंतर गैरप्रकार झाल्याचे उघड झाल्यानंतर विद्यापीठाने पोलिसांत धाव घेतली होती. त्यादरम्यान परीक्षा नियंत्रक डॉ.श्रीकांत कोकरे यांनी त्यांच्या पात्रतेची कागदपत्रे अपूर्ण दिल्याने त्यांना पदावरून काढण्यात आले होते.
यानंतर सायबर क्राईमने कसून तपास केला व हा गैरप्रकार समोर आला.दरम्यान, नापास तथा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना गुण वाढवून देणारी टोळी विद्यापीठात कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.
या प्रकरणी पोलिसांनी परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत कोकरे, तत्कालीन यंत्रणा विश्लेषक प्रशांत चोरमले, सुविधा समन्वयक हसन शेख व प्रोग्रामर प्रवीण गायकवाड या चौघांना दोषी धरत मंगळवारी 19 रोजी अटक केली.
चारही जणांना कोर्टापुढे उभे केले असता न्यायाधीशांनी चौघांना 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
ही कारवाई शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे, फौजदार होटकर, बायस, हवालदार श्रीरंग कुलकर्णी, संतोष येळे, प्रांजली काळे, सचिन गायकवाड, बाबू मंगरूळे, अमोल कानडे, करण माने, वसिम शेख, प्रवीण शेळकंदे, पूजा कोळेकर, अर्जून गायकवाड, समर्थ शेळवणे आदींनी पार पाडली.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज