टीम मंगळवेढा टाईम्स।
काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाची निवडणुक चुरशीची होत आहे. विस्कटलेल्या काँग्रेसमुळे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री, सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे याच्यासाठी अस्तित्वाची लढाई मानली आहे
भाजपने दोन निवडणुकांमधून सोलापूर आपल्या ताब्यात ठेवलं आहे. या निवडणुकीत भाजपने माळशिरसचे भाजपचे आमदार राम सातपुते यांना मैदानात उतवरुन प्रणिती शिदेंसमोर कडवं आव्हान उभं केले आहे.
ऊसतोड मजुराचा मुलगा विरूध्द माजी मुख्यमंत्र्याची कन्या असा रंग देत राम सातपुते यांनी धार्मिक ध्रुवीकरणावर जास्त भर दिला आहे.
निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या दिवशी प्रणिती शिंदे यांच्या विरोधात त्यांचे नाव न घेता एका अपक्ष उमेदवाराने बॅनरबाजी केली आहे. अपक्ष उमेदवार सचिन म्हस्के यांनी सोलापुरच्या विविध चौकात शिंदेंच्या विरोधात लावलेले फलक सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहेत.
“वडिलांनी मागच्या 40 वर्षात सोलापूरसाठी काहीही केलं नाही, त्यांची लेक काय करणार.? अशा आशयाचे बॅनर्स झळकले आहेत. तर दुसरीकडे गेल्या दहा वर्षात भाजपच्या दोन्हीही खासदाकांनी सोलापुरचा विकास केला नाही, असा आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
सोलापूर लोकसभा प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी सोलापुरात आज भव्य पदयात्रा काढण्यात आली. सोलापुरातील कन्ना चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक अशी ही पदयात्रा होती.
या पदयात्रेत प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय गृह मंत्री सुशिलकुमार शिंदेंसह आघाडीतील नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रणिती शिंदे या कुठलीही सुरक्षा न घेता रात्रदिवस प्रचार करीत आहेत. विरोधक कितीही असले तरी ती एकटी लढू शकते याचेच हे उदाहरण आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभेत ती विरोधी पक्षात होती त्यामुळे ती चांगलीच तयार झालेली आहे, असे सुशीलकुमार म्हणाले. प्रणिती शिंदे यांच्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आदींनी प्रचार सभा घेतल्या आहेत.
गेल्या दोन निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिंदे बाप-लेक मतदारसंघ पिंजून काढत आहेत. गेल्या निवडणुकीत काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांचा भाजपचे उमेदवार डॉ. जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी पराभव केला होता.
मोदीच्या लाटेत 2014 आणि 2019च्या निवडणुकीत सोलापुरात काँग्रेसचा सुपडा साफ झाला होता. भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावत जिल्ह्यातील सर्व विधानसभा आपल्या ताब्यात घेतल्या आहेत.(स्रोत:सरकारनामा)
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज