टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यासह आसपासच्या तालुक्यांतूनही दिवाळी खरेदीसाठी गर्दी वाढत आहे. कोरोना महामारीमुळे गेल्यावर्षी आलेले मंदीचे सावट हळूहळू दूर होताना दिसत असून , बाजारपेठेत नवचैतन्य दिसत आहे.
मागील वर्षी कोरोना महामारीपासून सण, उत्सव साजरे करण्यावर काही अंशी बंधने आली होती. कोरोनाचे संकट अद्याप पूर्णत: संपले नसले तरी सध्यातरी कोरोनाचे सावट कमी होताना दिसत आहे.
त्यामुळे नागरिकांमध्येही आता उत्साह वाढत असून, बाजारपेठांमध्ये नवचैतन्य आले आहे. मंगळवेढ्यात मोठी होलसेल बाजारपेठ असल्याने मंगळवेढा तालुक्यासह आसपासच्या भागातून अनेक व्यावसायिक येथे माल भरण्यासाठी येतात.
तसेच आपल्या किरकोळ खरेदीसाठीही येतात. इलेक्ट्रॉनिक, कापड, किराणा बाजारात दिवाळीनिमित्ताने गर्दी वाढत आहे.
फटाक्यांचे स्टॉल आठवडा बाजारात उभारण्यात आले असले, तरी अद्याप तेथे गर्दी दिसून येत नाही. दुकानांच्या समोर अडकविलेले विविध आकारांचे विविध रंगी आकाशकंदील दिवाळी जवळ आल्याची जाणीव करून देत आहे.
दिवाळीनिमित्ताने दुकानांसमोर विविध कंपन्यांच्या वतीने त्यांच्या जाहिरातीच्या व स्वागताच्या कमानी उभारल्या जातात. रहदारीला अडथळा होऊ नये म्हणून नुकतेच पोलिसांनी व्यापारी वर्गाला सूचना दिल्या होत्या.
या पार्श्वभूमीवर कमानी उभारण्याचे प्रमाण यंदा कमी आहे. कोरानानंतर बाजारपेठ हळूहळू सावरताना दिसत आहे. लोकांमध्येही खरेदीचा उत्साह दिसून येत आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज