मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
महाराष्ट्र राज्य सरकार अन्वये मूलभूत तथा वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत पंढरपूर नगरपरिषदेमधील नामसंकीर्तन सभागृहातील विविध बाबींच्या विकासासाठी २० कोटी निधी मंजूर झाला असल्याची माहिती पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
या प्रसिद्धीपत्रकात असे म्हटले आहे की, माजी आमदार प्रशांत परिचारक व मी मिळून पंढरपूर शहरातील भौतिक आणि सांप्रदायिक वैभवाचे प्रतिक असणाऱ्या या सभागृहाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सतत पाठपुरावा आणि पत्रव्यहार केला होता.
२०१६ साली तत्कालीन मुख्यमंत्री ना.देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारकडून मंजूरी मिळाली होती त्यावेळेस २५ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला होता मंजूर झालेल्या निधीमधून सदर नामसंर्कितन सभागृहाचे बांधकाम काही प्रमाणात पुर्ण झाले आहे. मात्र उर्वरित निधी सध्या मिळाला आहे.
देशातील एक महत्त्वपूर्ण आणि खूप मोठी अध्यात्मिक परंपरा असलेल्या पंढरपूर शहरासाठी आणि भागवत धर्माचे पाईक असणाऱ्या वारकरी भक्तांच्या किर्तन अस्मितेसाठी आवश्यक असणारे नामसंकीर्तन सभागृह या निधीमुळे देखण्या रूपामध्ये पंढरी नगरीमध्ये उपलब्ध होणार आहे.
त्याचबरोबर वर्षभर विविध वारीच्या निमित्ताने पंढरपूर मध्ये कीर्तनसेवा करणाऱ्या भाविकांना व कीर्तनकार मंडळींना या सभागृहामुळे अध्यात्मिक विचारांची मांडणी करण्यासाठी सुलभ आणि प्रशस्त व्यासपीठ उपलब्ध होणार असल्याचे आ.आवताडे म्हणाले.
सभागृहामध्ये उपलब्ध होणाऱ्या सोयी-सुविधा
सदर निधी अंतर्गत पंढरपूर येथील नामसंकीर्तन सभागृहामध्ये उपलब्ध होणाऱ्या सोयी-सुविधा पुढील प्रमाणे – सभागृहामध्ये आधुनिक पद्धतीने विद्युत व्यवस्था करणे, भव्य ऑडिटोरियम रूम ची निर्मिती करणे, सुबक पद्धतीने ड्रेनेज व्यवस्था करणे, पाणी व्यवस्था करणे, अंतर्गत रस्ते, लँडस्केपिंग आधी सुविधांची निर्मिती होणार आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज