मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा । कोरोनाच्या ह्या महासंकटाच्या परिस्थितीशी संपूर्ण महाराष्ट्र एकत्रितपणे झुंज देत आहे. अनेक संस्था लोकांच्या मदतीला धावून जात आहेत, त्यांच्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करत आहेत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सुद्धा या मदत कार्यात पाठीमागे नाहीत, पण ज्या गरीब आणि गरजूंना आपण मदत देत आहोत त्यांना फोटो काढण्यासाठी कॅमेरात बघायला लावणे तसेच आपण देऊ केलेली मदत छायाचित्र काढून प्रदर्शित करणे कितपत योग्य आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
याबाबत राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना काही सुचना केल्या आहे. गॉगल लावून मदतकार्य करतानाची छायाचित्रं काढुन आपण ज्याला मदत करतो आहोत त्याचा चेहरा दाखवून आपण त्याला अधिक लाजवत नाही का?, मुळात प्रत्येक माणूस स्वाभिमानी असतो आणि शक्यतो त्याला मदत घेणं नको असतं पण आज प्रसंग बाका आहे. त्यामुळे तो नाईलाजाने मदत स्वीकारत आहे. अशा वेळेस त्याची छायाचित्र काढून त्याची मान शरमेने खाली घालण कितपत योग्य आहे? असे प्रश्न राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना विचारले आहेत.
राज ठाकरे पुढे म्हणतात, महाराष्ट्राची निरपेक्ष सेवेची परंपरा मोठी आहे. त्या परंपरेच पुन्हा एकदा दर्शन आपण सगळ्यांनी जगाला दाखवूया. तसेच सर्व राजकीय कार्यकर्त्यांनी, सामाजिक संस्थांनी मदतकार्य करत असताना स्वत:ची, कुटुंबाची काळजी घ्यावी व बाहेर पडताना मास्क लावावा, सॅनिटायझार सोबत ठेवा आणि प्रशासनाला जास्तीत जास्त विश्वासात घेऊन काम करावे, असे आवाहन केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज