टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन झाल्याने या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदान झाले आहे.
पोटनिवडणुकीची आचारसंहिता असल्याने पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांना सोलापुरातील कोरोनासंदर्भातील उपाय योजनांबाबतची आढावा बैठक घेण्यास अडचणी येत होत्या.
या पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदान होताच पालकमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी आज रविवारी सकाळी 11 वाजता सोलापूर जिल्हा प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांची आढावा बैठक बोलविली आहे.
पोटनिवडणुकीची आदर्श आचारसंहिता अद्यापही सुरु असल्याने या बैठकीसाठी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी घेतली आहे.
पालकमंत्री दत्तात्रय भरणे हे आज सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहेत. सोलापुरातील सात रस्ता येथील नियोजन भवनात सकाळी 11 वाजता प्रमुख प्रशासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक ते घेणार आहेत.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाय योजनांचा ते अधिकाऱ्यांकडून आढावा घेणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सोलापूर शहर व जिल्ह्यात दररोज एक हजार ते दीड हजार नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडत आहे. पंचवीस ते तीस व्यक्तींचा रोज कोरोनामुळे मृत्यू होत आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यात कोरोनाच्या संकटात रेमडेसिव्हिर इंजेक्शन व ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे.
कोरोनाबाधित रुग्णांना सोलापुरात बेड उपलब्ध होत नाहीत, अशी विदारक स्थिती सोलापूर शहर व जिल्ह्यात सध्या झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री भरणे आजच्या बैठकीत काय निर्णय घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात भरणे यांनी सोलापुरात कोरोना संदर्भात आढावा बैठक घेतली होती.
आचारसंहिता कालावधीत बैठक घेण्यासाठी पालकमंत्र्यांना केंद्रीय निवडणूक आयोगाची परवानगी आवश्यक असल्याने ही परवानगी घेऊन त्यांनी ही बैठक घेतली होती. त्यानंतर मात्र पालकमंत्री भरणे यांनी पंढरपुरातील राष्ट्रवादीचे उमेदवार भगिरथ भालके यांच्या प्रचारासाठी बहुतांश वेळ दिला होता.
काल या पोटनिवडणुकीसाठी मतदान होताच भरणे यांनी सोलापुरातील कोरोनाच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा लक्ष घातले आहे. आजच्या बैठकीत कोरोनाच्या नियमांचे व सूचनांचे पालन करण्यासोबतच पोटनिवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेचे पालन होईल, याची दक्षता प्रशासनातील अधिकाऱ्यांनी घ्यावी, अशी स्पष्ट सूचना पालकमंत्री भरणे यांनी केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज