बाळासाहेब झिंजुरटे । सांगोला शहरातील पुजारवाडी येथे सोमवारी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगोला नगरपालिका हद्दीत पुढील आदेश येईपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, व्यवसाय बंद राहणार असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.
कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत.तरीदेखील सोमवारी सकाळी सांगोला शहरात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. शहरातील पुजारवाडी येथील ७२ वर्षीय व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. सदर व्यक्तीस दोन दिवसापूर्वी त्रास जाणवू लागल्याने सोलापूर येथे उपचारासाठी पाठवण्यात आले होते. कोरोना बाधित असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेली व्यक्ती शोधण्याचे काम सुरू आहे. सांगोला शहर व परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जाहीर करण्यात आले असून आरोग्य विभागामार्फत सर्वे क्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.
तसेच वाकी – घेरडी येथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून त्यांच्यावर मेडशिंगी कोविड केअर केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी केले आहे.
सांगोला नगरपरिषद हद्दीत पुढील आदेश येईपर्यंत अत्यावश्यक सेवा ( दवाखाने व औषध दुकाने ) वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना बंद करण्यात येतील. दूध , भाजीपाला व इतर अत्यावश्यक सुविधा करता नगरपरिषद सांगोला यांचे समन्वयाने संबंधित वॉर्ड मधील नगरसेवक व इतर लोकप्रतिनिधी यांचे मार्फत स्वयंसेवक निवडून संबंधित सेवा घरोघरी पुरवल्या जातील. शासकीय कार्यालय , बँक या ठिकाणी कोणत्याही नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही अशी माहिती उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी दिली.
सांगोला शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर सांगोला नगरपालिका हद्दीतील परिसर प्रतिबंधित क्षेत्र घोषित केला आहे. तसेच प्रतिबंधित क्षेत्रापासून चार किमीचा परिसर, चिंचोली,आवताडे वस्ती , वाढेगांव ,गोडसेवाडी , बामणी शिवेपर्यंत , कडलास ,वासुद हे क्षेत्र बफर क्षेत्र घोषित केले आहे.
—————————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज