टीम मंगळवेढा टाईम्स ।
कोरोनामुळे दहावी पाठोपाठ बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. विभागीय मंडळाकडे १ कोटी २२ लाख ९४ हजार ४८० रुपये परीक्षा शुल्क जमा असून, विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क परत देण्याबाबत अद्याप कोणताच निर्णय शासनाने जाहीर केलेला नाही.
कोरोनामुळे गतवर्षी जुलैपासून शैक्षणिक सत्र सुरू झाले. मात्र, ऑनलाइन अध्यापन सुरू होते. नोव्हेंबरमध्ये प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले. मार्चमध्ये परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले.
परंतु कोरोना रुग्णसंख्येतील सातत्यपूर्ण वाढीमुळे परीक्षा दोन वेळा पुढे ढकलण्यात आल्या. ऑफलाइन परीक्षा घेणार असल्याचे घोषित करण्यात आले होते.
मात्र, सद्य:स्थितीत विद्यार्थी सुरक्षेचा प्रश्न उद्भवला असल्याने प्रत्यक्ष परीक्षा घेणे शक्य नाही. त्यामुळे परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. अंतर्गत मूल्यमापनावरून मुलांना सरसकट पास करण्यात येणार आहे.
४४० प्रमाणे परीक्षा शुल्क प्रत्येक विद्यार्थ्यास आकारण्यात आले होते. परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे; परंतु परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत करण्याबाबत अद्याप काहीच सूचना नाहीत.
परीक्षा रद्द करण्यात आल्याने परीक्षा शुल्क विद्यार्थ्यांना परत देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.
बारावीचा निकाल तयार करताना दहावी की अकरावीच्या गुणांचा आधार घ्यावा याबाबत अद्याप विचार विनिमय सुरू आहे. मात्र, ऑगस्टमध्ये बारावीचा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
शासनाने ऐनवेळी बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मार्चमध्ये परीक्षेचे वेळापत्रक सुरुवातीला जाहीर करण्यात आले होते. त्याचवेळी कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर परीक्षा घेता आल्या असत्या. मात्र, परीक्षा रद्द केली. परीक्षा होणार नसल्याने परीक्षा शुल्क परत करावे. – सुरेश झिंजुरटे, पालक
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज